प्रभागातील फुटकळ कामांसाठी वर्गीकरणातून दमडीही नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

"शहर विकासासाठी आखलेले प्रकल्प पूर्ण केले जातील. काहींची कामे लगेचच हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या कामांची आवश्‍यकता नाही, त्यासाठी वर्गीकरणातून निधी देण्यात येणार नाही. अर्थसंकल्पातील योजनांना प्राधान्य राहील.'' 

- श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते

पुणे : नियोजित महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या उभारणीला प्राधान्य देण्याचे धोरण महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने घेतल्याने प्रभागांमधील फुटकळ कामे पूर्णपणे बाजूला सारली जाणार आहेत. त्यात गल्लीबोळातील रस्त्यांचे डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण, पदपथांची दुरुस्ती, सांडपाणी वाहिन्यांमधील गाळ काढणे, झाडूकाम, चौक आणि सोसायट्यांमध्ये बाक बसविण्यासह देखभाल-दुरुस्तीसाठी नवा पैसाही वर्गीकरणाद्वारे न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. परिणामी, शोभेच्या कामांवर होणारी लाखो रुपयांची उधळपट्टी थांबण्याची आशा आहे. मात्र, जुने व छोटे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यावर भर राहणार आहे. 

महापालिकेच्या 2018-19च्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करताना त्याची मोडतोड करू नये. ज्या प्रकल्पांसाठी निधी राखून ठेवला आहे, तो त्याच कामासाठी वापरावा. ज्यामुळे अर्थसंकल्पातील योजना मार्गी लागतील, अशा सूचना भाजप नेतृत्वाने महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

नव्या योजना आखण्याऐवजी जुन्या प्रकल्पांची कामे सुरू करण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. विशेषत: मेट्रो, समान पाणीपुरवठा, नदी सुधार, नदीकाठ संवर्धन, सायकल योजना, शिवसृष्टी, कचरा प्रकल्प आणि उड्डाण पूल या प्रकल्पांना प्राधान्य देत, त्या-त्या प्रमाणात निधी राखून ठेवला आहे. त्यानुसार पुढील वर्षभरात प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा वेग वाढविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. 

गल्लीबोळातील कामे मांडत नगरसेवक वर्गीकरणाद्वारे लाखो रुपयांची मागणी करतात. त्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून दबाब आणून प्रस्ताव मंजूर करून घेतले जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे महत्त्वाच्या प्रकल्पांच्या निधीचे वर्गीकरण करून आवश्‍यकता नसलेल्या कामांसाठी लाखो रुपयांची उधळपट्‌टी होत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर पुढील वर्षातील प्रकल्प, त्यांची अंमलबजावणी आणि उपलब्ध निधीचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून नव्या अर्थसंकल्पातून वर्गीकरणे न करण्याचा निर्णय पक्षाच्या पातळीवर घेण्यात आला आहे. त्यानुसार सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना सूचनाही केल्या असल्याचे सांगण्यात आले. 

सभागृह नेते श्रीनाथ भिमाले म्हणाले, ""शहर विकासासाठी आखलेले प्रकल्प पूर्ण केले जातील. काहींची कामे लगेचच हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या कामांची आवश्‍यकता नाही, त्यासाठी वर्गीकरणातून निधी देण्यात येणार नाही. अर्थसंकल्पातील योजनांना प्राधान्य राहील.'' 

नगरसेवकांना आदेश 

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा विचार करून शहरातील जुने प्रकल्प हाती घेण्याला सत्ताधारी भाजपने प्राधान्य दिले आहे. महापालिका निवडणुकीआधी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केल्यास निवडणुकांमध्ये फायदा होईल, असा अंदाज पक्षाच्या नेत्यांचा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जुन्या प्रकल्पांचा निधी इतर कामांना न देण्याची भूमिका घेतली होती. तसे प्रस्ताव मांडू नये, असा सूचनावजा आदेश पक्षाच्या नगरसेवकांना दिला आहे. 

या कामांसाठी होतात वर्गीकरणे 

-रस्त्यांचे डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण 
-सांस्कृतिक भवन, नाट्यगृह उभारणे 
-उद्याने, पुतळ्यांचे सुशोभीकरण 
-विद्युतविषयक कामे 
-भूमिगत वाहिन्या टाकणे 
-विविध स्मारकांमध्ये तैलचित्र उभारणे 
-पदपथावर सिमेंट ब्लॉक बसविणे 
-महापालिकेच्या कार्यालयांत वातानुकूलित यंत्रणा (एसी) बसविणे 
-पथ दिवे, खांब बसविणे 
-म्युझिकल कारंजे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News Pune News Pune Corporation No funds For Unnecessary Works