पुण्यानजीक दोन वाहने लुटणार्‍या टोळीस अटक

representational image
representational image

सासवड (ता. पुरंदर) : येथील दिवेघाटमार्गावर (ता. पुरंदर) चोरट्यांच्या तीन जणांच्या टोळीने दोन वेगळ्या प्रकारात दोन वाहने अडवून शस्त्राचा धाक दाखवून चालकांना लुटले. यात रोख रक्कम 3,220 रुपये लुटण्यात आले. मात्र ठाणे अंमलदार आर. जे. काळभोर यांच्या चाणाक्ष नजरेमुळे सासवड पोलीसांनी तीनही चोरटे रंगेहाथ पकडण्यात यश मिळविले. 

विकी संजय बोरगावे (वय 24), सुनील धोंडुसिंग ठाकुर (वय 24), स्वप्नील मनोज अमोलीकर (वय 21, सर्व रा. भेकराईनगर, फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) हे तिघे पोलिसांनी पकडलेले चोरटे आहेत.

काल पहाटे हा प्रकार घडला. सासवड (ता. पुरंदर) येथील न्यायालयात काल सायंकाळी तिन्ही संशयित आरोपी म्हणून चोरट्यांना नेले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली. याबाबत दोन घटनांचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र पवार, हवालदार राजेश पोळ, अजित माने आदी करीत आहेत.  

पोपट बलभिम ठोंबरे (वय 34, चालक, मासाळवाडी, लोणी भापकर, ता. बारामती, जि. पुणे) हे पहाटे ट्रक (एमएच 4 एएल 9928) घेऊन बारामतीकडे लोखंडी प्लेट घेऊन येत होते. मागून आलेल्या अज्ञात चोरट्यांच्या अल्टो कार (एमएच 12 एफवाय 1628) मधील तीनजणांनी वेग कमी होताच पहाटे सव्वादोन वाजता झेंडेवाडीफाट्यावर त्यांना अडविले. त्यांना तुटके फावडे दाखवून धमकी दिली व त्यांच्या सुमारे 820 रुपये, चालक परवाना काढून घेतला.

दरम्यान दिपक भिकाजी हरकळ (चालक ट्रक क्र. एमएच 16 बीसी 4959) हे त्यांची गाडी कोंबडीखाद्य घेऊन कापूरहोळकडे चालले होते. त्यांना त्यानंतर या तिघांच्या टोळीने दिवेघाटाच्यावर झेंडेवाडी फाटा येथे अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालक हरकळ हुशार असल्याने व प्रसंग लुटालुटीचा असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी स्वतःची गाडी थांबविली नाही.

चोरट्यांचा गाडीला ठोस देऊन ते निघाले. मात्र तिघांतील एक चोरटा वेग कमी लक्षात घेऊन हरकळ यांच्या गाडीत मागून चढला. सासवडला नगरपालिकेसमोर ट्रक थांबताच ट्रकवरील चोरटा खाली उतरला. मागील दोन चोरट्यांनी त्याला कारमध्ये घेतले. मात्र पोलीस ठाण्याचे पुढे त्यांनी पुन्हा ट्रकचालक हरकळ यांना गाठले.

मारहाण करीत 2400 रुपये व चालक परवाना लुटताना पंक्चर व्यावसायिक बापु होले यांनी पाहिले. त्यांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधला. तेव्हा ठाणे अंमलदार श्री. काळभोर आले व मारामारीचा प्रकार म्हणून साऱयांना पोलीस ठाण्यात नेले. मग अगोदर लुटलेले चालक श्री. ठोंबरे आले व हा लुटमारीचा प्रकार उजेडात आला. तिन्ही चोरट्यांना मग अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com