पुणे : सुतारदरा, किश्‍किंधानगरला गाड्यांची तोडफोड 

पुणे : सुतारदरा, किश्‍किंधानगरला गाड्यांची तोडफोड 

पौडरस्ता (पुणे) : कोथरूड येथील सुतारदरा येथे पाच चारचाकी वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री घडला. याच परिसरात एका श्‍वानासही दगडाने ठेचून मारण्यात आले. याबरोबरच किष्किंधानगरमध्येही दुचाकींची तोडफोड करण्यात आली. वाहनांची तोडफोड करण्याची ही 15 दिवसांतली तिसरी घटना आहे. दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. येथील गुंडांवर पोलिसांचा वचक नसल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. 

सुतारदरा, किष्किंधानगर परिसरामध्ये 15 दिवसांपूर्वी चारचाकी व दुचाकी वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर मद्यपींचा गोंधळ, दगडफेक, धारदार शस्त्रांचा धाक दाखवून दहशत निर्माण केली जात आहे. त्यापाठोपाठ धूलिवंदनाच्या मध्यरात्री पुन्हा गाड्यांची तोडफोड झाल्यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. सुतारदरा परिसरातील शिवकल्याण मित्र मंडळाच्या गणेश मंदिरामागे पाच चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. तसेच, किष्किंधानगरमधील नवयुग मित्र मंडळाजवळही दुचाकी फोडण्यात आल्या. 

या घटनेत तोडफोड झालेल्या टेम्पोचे मालक उत्तम आदमाने म्हणाले, ''माझ्या टेम्पोसह इतरांच्या मारुती व्हॅन, रिट्‌झ कार, अन्य दोन वाहने गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी फोडली. यापूर्वीच्या दोन घटनांमध्येही रहिवाशांना झळ पोचली आहे.'' 

नागरी सुरक्षा समितीचे संदीप कुंबरे म्हणाले, ''पोलिसांचा वचक नसल्यामुळेच वाहनांच्या तोडफोडीच्या घटना सातत्याने घडत आहेत. परिसरात पोलिस चौकी असावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, रात्रीची गस्त वाढवावी, यासाठी सातत्याने मागणी करूनही पोलिस ठोस भूमिका घेत नाहीत.'' वाहनांच्या तोडफोडीबरोबरच श्‍वानाचा जीव घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आणि पोलिसांनी गुंडांना जरब बसविण्याची मागणी सुनील सुतार यांनी केली. 

दरम्यान, कोथरूड पोलिस ठाण्याच्या अंतर्गत किष्किंदानगरमधील सहायक पोलिस निरीक्षक रमेश नारायण चांदवडे म्हणाले, ''तोडफोडीप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तर सुतारदरा येथील नागरिकांची तक्रार नोंदणी झाली आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com