चोरीची गाडी खरेदी करणाऱ्यालाही तीन वर्षे शिक्षेची तरतूद

चोरीची गाडी खरेदी करणाऱ्यालाही तीन वर्षे शिक्षेची तरतूद

पुणे : शहर व पिंपरी- चिंचवड परिसरात दुचाकी चोरून त्या ग्रामीण भागात सर्रास विकणाऱ्यांची साखळी कार्यरत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. चोरलेल्या दुचाकी कमी पैशांत आणि तत्काळ विकण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, कमी पैशांच्या आमिषाने या चोरीच्या दुचाकी घेणाऱ्या व्यक्‍तीवर (रिसिव्हर) तीन वर्षे तुरुंगवास भोगण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे आपली दुचाकी चोरीस जाऊ नये, यासाठीची पुरेपूर काळजी घेतानाच, जुनी दुचाकी खरेदी करताना ती चोरीची तर नाही ना, याचीही खबरदारी नागरिकांना घ्यावी लागणार आहे. 

नागरिकांच्या दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या तक्रारींवरून दुचाकी चोरीच्या घटनांची तीव्रता लक्षात येऊ शकते. रेल्वे स्थानक, बस स्थानक, रुग्णालये, महाविद्यालयांचे वाहनतळ, गर्दीची ठिकाणे आणि चौपाटी अशा ठिकाणांहून ही वाहने चोरीस जातात. त्यानंतर चोरट्यांकडून ही वाहने हस्तकांमार्फत अन्य शहरांमध्ये विकली जातात. "मला पैशांची गरज आहे, गाडीची कागदपत्रे नंतर देतो,' असे सांगून अवघ्या पाच- दहा हजार रुपयांमध्ये महागड्या दुचाकी विकल्या जात आहेत. 

पोलिसांनी गेल्या महिन्यात दुचाकी चोरणाऱ्या वीसहून अधिक आरोपींना ताब्यात घेतले. चोरलेल्या दुचाकींची शहरातील गरीब व कामगारांबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांना खोटे बोलून सर्रास विक्री केली जात असल्याचे त्यांच्या चौकशीतून स्पष्ट झाले. विशेषतः चोरीच्या दुचाकी विकत घेणाऱ्यांवर मागील महिन्यात कारवाई करून त्यांना अटक केली आहे. त्यामुळे दुचाकी चोरट्यांइतकेच ती विकत घेणारेही कायद्याच्या दृष्टीने जबाबदार असल्याचे अधोरेखित झाले आहे. 

चोरीच्या दुचाकी ग्रामीण भागात विकल्या जातात. विविध प्रकारची कारणे सांगून या गाड्या विकल्या जातात. मात्र चोरीच्या गाड्या घेताना आपणही गुन्हेगार ठरू शकतो, याची कल्पना नागरिकांना नसते. चोरीचे वाहन किंवा चोरीची मालमत्ता खरेदी करणारा कलम 411 अन्वये आरोपी ठरतो. हा गुन्हा दखलपात्र असून त्यास जामीन मिळत नाही. तसेच, तीन वर्षांची कैद किंवा दंड होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी जुन्या दुचाकी घेताना आवश्‍यक काळजी घ्यावी, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

चोरीची गाडी विकत घेणे हा गुन्हा आहे, त्यामुळे चोरीची गाडी खरेदी करणारा कायद्याच्या कचाट्यात अडकल्याशिवाय राहत नाही. कागदपत्रे असल्याशिवाय जुन्या गाड्या खरेदी करू नयेत. यापूर्वीच्या अनेक गुन्ह्यांत चोरीची दुचाकी विकत घेणाऱ्यांना (रिसिव्हर) अटक केलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी. 
- पंकज डहाणे, पोलिस उपायुक्त 

नागरिकांनी काय काळजी घ्यावी 

  • जुन्या गाड्यांची खरेदी अधिकृत विक्रेते किंवा एजन्सीकडूनच करावी 
  • जुनी गाडी घेताना कागदपत्रांची पडताळणी करावी 
  • भूलथापा किंवा आमिषाला बळी पडू नये 
  • आपल्या वाहनाला "ट्रॅकिंग डिव्हाईस' बसवावे 
  • वाहनाचे हॅंडल लॉक करण्यास विसरू नये 
  • सीसीटीव्हीच्या परिसरातच पार्किंग करावी 

दुचाकी चोरीचे गुन्हे 
 

वर्ष घडलेले गुन्हे उघडकीस आलेले गुन्हे
2017 3169 963
2018 (आत्तापर्यंत) 444 ----

मागील महिनाभरात उघडकीस आलेले गुन्हे 

पोलिस ठाणे व विभाग गाड्यांचे प्रकार गाड्यांची संख्या आरोपींची संख्या
खडक ऍक्‍टिवा 2 3
वानवडी हिरो होंडा स्प्लेंडर 5 2
गुन्हे शाखा स्प्लेंडर, पॅशन प्रो, शाईन 35 3
चतुःशृंगी विविध प्रकार 13 3
विश्रामबाग व्हिक्‍टर, स्कूटर, ऍक्‍टिवा 4 2
भारती विद्यापीठ विविध प्रकार 12 3


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com