विद्यापीठांसाठी आता मॉडेल अभ्यासक्रम 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

पुणे : जग बदलत असताना देशातील विद्यापीठे मात्र कालसुसंगत अभ्यासक्रम तयार करायला तयार नाहीत. त्यामुळे आता विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद हे दरवर्षी मॉडेल अभ्यासक्रम तयार करणार आहेत. विद्यापीठांनी अभ्यासक्रम बदलला नाही, तर हा अभ्यासक्रम त्यांना स्वीकारावाच लागेल, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. 

पुणे : जग बदलत असताना देशातील विद्यापीठे मात्र कालसुसंगत अभ्यासक्रम तयार करायला तयार नाहीत. त्यामुळे आता विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद हे दरवर्षी मॉडेल अभ्यासक्रम तयार करणार आहेत. विद्यापीठांनी अभ्यासक्रम बदलला नाही, तर हा अभ्यासक्रम त्यांना स्वीकारावाच लागेल, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. 

'इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया'ने सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. त्याच्या उद्‌घाटनावेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष सनदी लेखापाल नीलेश विकमसे, शिवाजी झावरे, अतुल गुप्ता, महेश किनारे, अरुण आनंदगिरी हे व्यासपीठावर उपस्थित होते. 

शिक्षण संस्था जागतिक ज्ञान देणार नसतील, तर विद्यार्थीदेखील रोजगारक्षम तयार होणार नाहीत. अनेक विद्यापीठे अजूनही त्या दृष्टीने प्रयत्न करत नाहीत, अशी खंत जावडेकर यांनी व्यक्त केली. 

बीकॉम करताना सीएदेखील करता येते. कारण पदवीसाठी वेगळा अभ्यासच करावा लागत नाही, असे सांगताना जावडेकर यांनी अभ्यासक्रम बदलत नसल्याबद्दल खेद व्यक्त केला. 'जग एक होत आहे; पण अभ्यासक्रम तेच आहेत. विद्यापीठांच्या अभ्यास मंडळांना ते बदलण्याची गरज वाटत नाही. जे विद्यार्थ्यांच्या हिताचे आणि गरजेचे आहे, तेच तुम्ही शिकवणार नसाल, तर ते चालणार नाही. तुम्ही बदलणार नसाल, तर शिक्षणाच्या नियामक संस्था तुम्हाला मॉडेल अभ्यासक्रम देतील,' असे त्यांनी स्पष्ट केले. 

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ''देश भ्रष्टाचारमुक्त करण्याचे काम सनदी लेखापाल करू शकतो. ज्या संस्था, उद्योगांचे तुम्ही लेखापरीक्षण कराल, त्या वेळी त्यांना चांगल्या मार्गाने व्यवहार करायला भाग पाडा. कुणी आर्थिक गैरप्रकार करू नये, म्हणून नैतिकता पेरण्याची जबाबदारी तुमची आहे.'' 

परदेशी विद्यार्थ्यांची उपस्थिती 
व्यावसायिक क्षेत्रात उत्कृष्टता, मूल्य आणि सचोटी या विषयांवर ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी दोन हजारांहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. या परिषदेसाठी नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान आदी देशांतूनही विद्यार्थी आले आहेत, अशी माहिती महेश किनारे यांनी दिली.

Web Title: marathi news pune news pune education CA Indian universities