आईने दिले मुलीला गर्भाशय 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

पुणे : वयाची 52 वर्षे उलटलेल्या आईने तिच्या मुलीला गर्भाशय दान केल्याची घटना पुण्यातील गॅलॅक्‍सी केअर लॅप्रोस्कोपिक इन्स्टिट्यूटमध्ये प्रजासत्ताकदिनी घडली. ज्या गर्भाशयातून तिचा जन्म झाला आहे, त्याच गर्भाशयातून आपल्या मुलाला जन्म देण्यासाठी ती आता वैद्यकीयदृष्ट्या तयार होत आहे.

पुणे : वयाची 52 वर्षे उलटलेल्या आईने तिच्या मुलीला गर्भाशय दान केल्याची घटना पुण्यातील गॅलॅक्‍सी केअर लॅप्रोस्कोपिक इन्स्टिट्यूटमध्ये प्रजासत्ताकदिनी घडली. ज्या गर्भाशयातून तिचा जन्म झाला आहे, त्याच गर्भाशयातून आपल्या मुलाला जन्म देण्यासाठी ती आता वैद्यकीयदृष्ट्या तयार होत आहे.

पुण्यातील गॅलॅक्‍सी केअर लॅप्रोस्कोपिक इन्स्टिट्यूटमध्ये देशातील सलग तिसरी गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शुक्रवारी यशस्वी झाली. आईनेच आपल्या मुलीला गर्भाशय दान केले. अत्यंत कमी वेळेत म्हणजे सुमारे दोन तास 35 मिनिटांमध्ये ही गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. मोठा रक्तस्राव होऊ न देता ही शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती इन्स्टिट्यूटचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी दिली. 

ते म्हणाले, ''लहानपणापासूनच त्या मुलीला गर्भाशय नव्हते. विवाहानंतर पाच वर्षे झाली तरीही, त्यामुळे तिला अपत्याला जन्म देणे शक्‍य झाले नव्हते. यातून मार्ग काढण्यासाठी तिने गर्भाशय प्रत्यारोपणाचा मार्ग स्वीकारला. त्यासाठी तिच्या आईने गर्भाशय दान करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिच्या आईची रजोनिवृत्ती झाली होती, त्यामुळे त्यांचे गर्भाशय व्यवस्थित कार्यान्वित आहे का, हे तपासण्यासाठी त्यांना औषधे देऊन मासिक पाळी आणण्यात आली. त्यातून त्यांचे गर्भाशय व्यवस्थित असल्याचे समजले. त्यानंतर गर्भाशय दान करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मुलीला आपल्याच पोटातून अपत्याला जन्म देण्याची प्रखर इच्छा होती, त्यामुळे गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेपूर्वी त्यांचे स्त्रीबीज काढून ठेवले आहे.'' 

''प्रत्यारोपणासाठी दुर्बिणीच्या साह्याने शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यापूर्वी झालेल्या दोन गर्भाशय प्रत्यारोपणांतही याच पद्धतीने दुर्बिणीतून शस्त्रक्रिया केल्या होत्या. जगभरामध्ये आतापर्यंत गर्भाशय दान करणाऱ्या महिलेच्या पोटाची चिरफाड करून गर्भाशय काढले जात होते. या नवीन पद्धतीमुळे दान करणाऱ्या रुग्णाच्या वेदना कमी करण्यात यश मिळाले आहे,'' असेही त्यांनी स्पष्ट केले. 

स्त्री रोग आणि प्रसूतिरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद तेलंग म्हणाले, ''ही फार दुर्मीळ शस्त्रक्रिया आहे. सामान्यतः स्त्रियांमध्ये गर्भाशय असते. साडेचार हजारांमध्ये एका स्त्रीमध्ये जन्मतः गर्भाशय नसते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला या शस्त्रक्रियेची गरज राहात नाही. गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही सुरवात आहे. त्यानंतर या गर्भाशयात गर्भ सोडला जाईल. तेथे त्याची वाढ केली जाणार आहे. त्यानंतर सीझर करून प्रसूती केली जाईल.'' 

या सर्व प्रक्रियेमध्ये सरकारी यंत्रणेचे मोठे सहकार्य मिळाल्याचे डॉ. पुणतांबेकर यांनी आवर्जून सांगितले. ते म्हणाले, ''मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनमंत्री गिरीश महाजन यांच्यापासून ते सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्यापर्यंत प्रत्येकाने याला सकारात्मक प्रतिसाद दिला.'' 

पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: marathi news pune news pune medical news