थकबाकी वसुलीसाठी स्वतंत्र कक्ष करा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

पुणे : मिळकतकराची 2400 कोटी आणि पाणीपट्टीची 502 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. तसेच याबाबतच्या अभय योजनेचा आराखडा तयार करण्यास त्यांनी सांगितले आहे. मिळकतकर वाढीच्या प्रस्तावाबाबत निर्णय घेण्यासाठी आयोजित खास सभेत ते बोलत होते. 

मिळकतकराची सुमारे 2400 कोटी रुपये थकबाकी आहे. त्यातील 1200 कोटी रुपये दंडाची, तर उर्वरित 1200 कोटी मिळकतकराची थकबाकी आहे. दंडाच्या रकमेत सवलत देणे शक्‍य आहे का, अशीही विचारणा त्यांनी प्रशासनाला केली. पाणीपट्टीची थकबाकी सुमारे 502 कोटी रुपयांवर पोचली आहे.

मिळकतकर आणि पाणीपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केल्यास त्याद्वारे महापालिकेच्या तिजोरीत किमान 200 कोटी रुपयांची भर पडू शकते. त्यामुळे मिळकतकरात 15 टक्के वाढ करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. थकबाकी वसूल करण्यावर पुढील काळात प्राधान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

करवाढीस सर्वप्रथम रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोध केला होता. खास बैठकीत अविनाश बागवे आणि दिलीप बराटे यांनीही त्याला विरोध केला. शहरात 9 हजार 500 मिळकतींना तिप्पट कर आकारणी झाली आहे. त्यांच्याकडे सुमारे 153 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यांना एकपट कर आकारणी केली तर सुमारे 50 कोटी वसूल होऊ शकतात. त्यामुळे याबाबत प्रशासकीय आराखडा तयार करण्याची सूचना मोहोळ यांनी प्रशासनाला केली. 

वापरातील बदलानुसार आकारणी 
शहरातील अनेक इमारतींमध्ये सर्व गाळे व्यावसायिक आहेत; परंतु त्या इमारतीच्या बांधकाम आराखड्यात काही सदनिका निवासी दाखविलेल्या असतात; प्रत्यक्षात मात्र तेथे उद्योग-व्यवसाय सुरू असतात. अशा इमारतींमधील संबंधित सदनिका, गाळे शोधून त्यांच्याकडून व्यावसायिक दराने कर आकारणी करण्याचीही सूचना मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनाला दिली.

Web Title: marathi news pune news Pune Municipal Corporation Muralidhar Mohol