रामटेकडी प्रकल्प डिसेंबरमध्ये कार्यान्वित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

रामटेकडी येथील प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्याचा पहिला टप्पा येत्या डिसेंबर महिन्यात पूर्ण होईल. ज्यामुळे या प्रकल्पांतर्गत चारशे टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे बहुतांशी कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्‍य होणार आहे.
- सुरेश जगताप, प्रमुख - घनकचरा व व्यवस्थापन विभाग, महापालिका

पुणे - रामटेकडी येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या सुमारे साडेसातशे टन कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम येत्या डिसेंबर महिन्यात पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात या प्रकल्पाअंतर्गत चारशे टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून, त्यापाठोपाठ पुढील सहा महिन्यांत प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. या प्रकल्पाच्या उभारणीनंतर शहरात दररोज जमा होणाऱ्या सर्व कचऱ्यावर प्रक्रिया होण्याची आशा आहे. 

कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या उद्देशाने रामटेकडी येथील दहा एकर जागेत हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. मात्र स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी विरोध केल्याने काही दिवस प्रकल्पाच्या कामात अडचणी आल्या होत्या. दरम्यान, नागरिकांच्या आंदोलनामुळे प्रकल्पाचे काम बंद ठेवावे लागले होते. त्यानंतर दीड महिन्यापासून पुन्हा काम करण्यात आले आहे. सध्या कामाचा वेग फारसा नसला, तरी तो वाढविण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

शहरात आजघडीला रोज सुमारे १६०० टन कचरा जमा होता. त्यापैकी विविध प्रकल्पांच्या माध्यमातून साधारणत: एक हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. उर्वरित कचरा उरळी देवाची आणि फुरसुंगी येथील डेपोत टाकण्यात येतो. मात्र, जमा होणाऱ्या कचऱ्या प्रक्रिया करण्याचे नियोजन महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाने केले आहे. त्यानुसार पुढील पाच वर्षांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यातूनच रामटेकडी येथील प्रकल्पाचे काम काम हाती घेण्यात आले आहे. 

‘रोकेम’ अजूनही बंद
रामटेकडी येथील रोकेम प्रकल्पाला आग लागल्याने पंधरा दिवसांपासून हा प्रकल्प बंद आहे. त्यामुळे या प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही. आगीच्या घटनेनंतर चार दिवसांत प्रकल्प कार्यान्वित होईल, असे संबंधित कंपनीने सांगितले होते. प्रत्यक्षात अजूनही प्रकल्प सुरू झालेला नाही. त्यामुळे कचऱ्याची समस्या गंभीर होण्याची भीती आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी आता महापालिका लक्ष घालणार आहे.

महापालिका चालविणार प्रकल्प 
शहरात उभारण्यात येणारे कचरा प्रकल्प खासगीकरणाऐवजी महापालिका चालविणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांची कार्यक्षमता वाढण्याची आशा आहे. सध्या मोठ्या क्षमतेचे प्रकल्प खासगी कंपन्यांच्या माध्यमातून चालविले जातात. मात्र त्यातील एकही प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचे आढळले आहे. या पार्श्‍वभूमीवर पहिल्या टप्प्यात छोट्या क्षमतेचे प्रकल्प महापालिका चालविणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: marathi news pune news ramtekadi project