आदिवासींकडून वैद्यकीय नीतिमत्ता शिकायला मिळाली : डॉ. कोल्हे

आदिवासींकडून वैद्यकीय नीतिमत्ता शिकायला मिळाली : डॉ. कोल्हे

पुणे : बेहरागडला आदिवासींसाठी आरोग्यसेवा सुरू केल्यानंतर सुरवातीपासून खूप गंभीर रुग्णच माझ्याकडे येत होते. मी नव्यानेच त्या भागात काम सुरू केले असल्याने औषधांची कमतरता होती. अशा परिस्थितीत एखादा रुग्ण माझ्या रुग्णालयात दगावला असता, तर आदिवासींचा विश्‍वास पुन्हा संपादित करणे कठीण होते. मात्र, 'औषधोपचार करणे तुमच्या हातात आहे; रुग्ण जगणे किंवा दगावणे हे परमेश्‍वराच्या हातात आहे, ही वैद्यकीय नीतिमत्ता मला आदिवासींनी शिकवली,' अशी भावना मेळघाटात आदिवासी पट्ट्यात काम करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे यांनी व्यक्त केली. 

स्व. नलीनचंद फुलचंद गांधी यांच्या तेविसाव्या स्मृती दिनानिमित्त शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग येथे अनमोल पांडे या विद्यार्थ्यास डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांच्या हस्ते 'सर्वोत्कृष्ट छात्र पुरस्कार' प्रदान करण्यात आला. त्या वेळी डॉ. कोल्हे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर दै. 'सकाळ'चे कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार, बोर्डिंगचे अधीक्षक सुरेंद्र गांधी, विश्‍वस्त चकोर गांधी आणि अनुराधा गांधी उपस्थित होत्या. 

आपला जीवनप्रवास उलगडून दाखविताना डॉ. कोल्हे म्हणाले, ''विद्यार्थिदशेत मला विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांच्यावरील काही पुस्तके वाचायला मिळाली. 'अनटील टू धिस लास्ट' या पुस्तकाचाही मनावर प्रभाव पडला. त्यामुळे समाजातील शेवटच्या, वंचित, दुर्लक्षित, आदिवासी समाजातील व्यक्तींपर्यंत पोचून काम करण्याची इच्छा जागृत झाली. आता या भागात माता-बाल मृत्यूचे प्रमाण 40 टक्‍क्‍यांवरून 20 टक्‍क्‍यांवर आले आहे.'' 

प्रास्ताविक चकोर गांधी यांनी केले, तर सुरेंद्र गांधी यांनी पुरस्कारामागची भूमिका विशद केली. बोर्डिंगमधील चतुर्थश्रेणी कर्मचारी लक्ष्मण शिंदे यांची मुलगी चैत्रालीने चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केल्याबद्दल तिचा पालकांसह गौरव करण्यात आला. सौरभ छाजेड आणि अभय लोढा यांनी सूत्रसंचालन केले, तर पलाश पाटणी यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com