शिरसाई उपसा सिंचन योजनेला मिळाला मुहूर्त

संतोष आटोळे 
रविवार, 4 मार्च 2018

राजकिय श्रेयवादाच्या लढाईत कोणत्याही पक्षाच्या पुढाकाराने योजना सुरु न होता. संबंधित लाभार्थी गावांमधील शेतकऱ्यांनी पाणीपट्टीची रक्कम भरल्यानेच योजना सुरु झाली आहे.

शिर्सुफळ - गेल्या अनेक दिवसांपासुन सुरु होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या बारामती तालुक्यातील जिरायत भागास वरदान ठरलेली शिरसाई उपसा सिंचन योजना आज रविवार (ता. 04) सकाळी कार्यन्वित करण्यात आली. राजकिय श्रेयवादाच्या लढाईत कोणत्याही पक्षाच्या पुढाकाराने योजना सुरु न होता संबंधित लाभार्थी गावांमधील शेतकऱ्यांनी पाणीपट्टीची रक्कम भरल्यानेच योजना सुरु झाली आहे. कसेही असले तरी एकंदरीत योजना सुरु झाल्याने लाभार्थी भागातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. 
                 
याबाबत सविस्तर माहिती अशी कि बारामती तालुक्यातील जिरायत पट्ट्यातील गावांचा शेती सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी सन 2000-2001 मध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्चुन शिरसाई उपसा सिंचन योजना सुरु करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून तालुक्याच्या जिरायत भागाला वरदान मिळाले. सदर योजना ब्रिटीश कालीन शिर्सुफळ तलावावर राबविण्यात आली. यंदा मात्र थकित विजबिलाच्या प्रश्नामुळे योजना कार्यान्वित करण्यात अडचण येत होती. या पार्श्वभूमीवर योजना सुरु होणार कि नाही याबाबत प्रश्नचिन्ह होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष या दोघांनीही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांस बैठका घेवुन योजना कार्यान्वित करण्याबाबत मागणी केली होती. मात्र थकित पाणीपट्टी व विजबिलाचा प्रश्न तसेच प्रलंबित होता.यावर संबंधित भागातील शेतकऱ्यांनीच फमपुढाकार घेत पैसे एकत्र करीत जमा केले. यामुळे योजना सुरु करण्यास अखेर रविवारी मुहूर्त मिळाला. 
     
याबाबत शिरसाई उपसा सिंचन योजनेचे शाखा अभियंता एल. जी. भोंग यांनी दिलेल्या माहितीनुसार योजनेबाबत मागणीप्रमाणे पंधरा दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये डावा व उजवा या कालव्यांच्या माध्यमातून वसुलीच्या प्रमाणात पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतीसिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यामुळे डाव्या कालव्यांवरील जराडवाडी, उंडवडी कडेपठार, गोजुबावी, बऱ्हाणपुर, तर उजव्या कालव्यावरील उंडवडी सुपे, साबळेवाडी, कारखेल, खराडेवाडी, सोनाली सुपे, जळगाव, अंजनगाव या गावांना होणार आहे. मात्र वसुलीच्या प्रमाणातच पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे लाभार्थी गावांमधील शेतकऱ्यांनी पाणीपट्टी  भरणे आवश्यक आहे. असे असले तरी पाणी सुरु झाल्याने लाभार्थी  गावांमधील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

थकबाकी 75 लाख किमान पंन्नास टक्के वसुलीवर भर
शिरसाई उपसा सिंचन योजनेची जवळपास 75 लाख रुपये थकबाकी आहे. यामध्ये सध्याच्या आवर्तनात 50 टक्के वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. योजना अवलंबुन असलेल्या शिर्सुफळ तलावामध्ये सध्या 326 दशलक्ष घनफुट पाणीसाठा आहे. यापैकी 306 दशलक्ष घनफुट पाणीसाठा वापरण्यायोग्य तर 20.58 दशलक्ष घनफुट पाणीसाठा मृतसाठा आहे. यामध्ये 200 दशलक्ष घनफुट पाणी उपसाचे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती शिरसाई उपसा सिंचन योजनेचे शाखा अभियंता एल. जी. भोंग यांनी दिली.

Web Title: marathi news pune news river Irrigation shirsai