अपघातांना आमंत्रण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

पुणे - सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गाच्या पुनर्रचनेचे काम धोकादायक पद्धतीने सुरू असल्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. सुरक्षिततेच्या किमान नियमांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी मृत्यूचा सापळा निर्माण झाला आहे.

पुणे - सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गाच्या पुनर्रचनेचे काम धोकादायक पद्धतीने सुरू असल्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. सुरक्षिततेच्या किमान नियमांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी मृत्यूचा सापळा निर्माण झाला आहे.

सातारा रस्त्यावर कात्रज चौक ते पंचमी हॉटेल चौकादरम्यान साडेपाच किलोमीटर रस्त्याच्या पुनर्रचनेचे काम सुरू आहे. त्यासाठी महापालिका ७५ कोटी रुपये खर्च करीत आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये या रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. दोन्ही बाजूला तीन पदरी रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध राहणार असून, त्याच्या शेजारी सायकल ट्रॅक आणि पदपथ असेल. या रस्त्याच्या कामाने वेग घेतला आहे; परंतु काम सुरू असताना योग्य पद्धतीने बॅरिकेडींग करणे, फलक लावणे, रस्त्यात दगड आणि राडारोडा येणार नाही, अशी खबरदारी महापालिकेने घेणे आवश्‍यक होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या रस्त्यावरून फिरताना दिसून आले. 

सातारा रस्त्यावर सकाळी आणि सायंकाळी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. पद्मावतीजवळ खोदलेल्या रस्त्याची पुरेशी माहिती देणारे फलक नाहीत. तसेच, काम सुरू असलेल्या ठिकाणी मेट्रोच्या धर्तीवर बॅरिकेडींग झालेले नाही. लावलेले बॅरिकेड्‌स काही ठिकाणी रस्त्यावर पुढे आले आहेत.

त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. तसेच, बांधकामाचे दगडही काही ठिकाणी रस्त्यावर आले आहेत. परिणामी, वाहनांना वळसा घालून जावे लागते. त्यातून वाहतुकीची कोंडी होते. अनेक ठिकाणी क्रेनद्वारे राडारोडा उचलताना परिसरात धूळ उडते. त्या ठिकाणी पाणी मारून तो उचलणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांची आहे. तसेच, सिमेंटचा रस्ता तयार करताना त्यात पाणी सोडले जाते, ते अनेकदा रस्त्यावर येते. त्यातूनही अपघात होण्याची भीती नागरिकांनी वर्तविली. बीआरटी मार्गाला कायमस्वरूपी लावलेल्या बॅरिकेड्‌सची रचना नक्षीची असल्यामुळे रस्ता ओलांडताना नागरिकांना त्याचा उपद्रवच होण्याची शक्‍यता आहे.

अपघात झाल्यावर लक्ष देणार का? - तांबे 
याबाबत स्थानिक नगरसेवक विशाल तांबे म्हणाले, ‘‘ज्या ठिकाणी काम सुरू आहे, तेथे फलक लावणे, दोऱ्या लावणे आवश्‍यक आहे. तसेच, संबंधित ठिकाणी पूर्ण बॅरिकेडिंग आवश्‍यक आहे. रात्रीही त्या ठिकाणी वीजपुरवठा असणे गरजेचे आहे. परंतु याबाबत महापालिकेने दिलेल्या सूचनांकडे ठेकेदार दुर्लक्ष करीत असेल, तर त्यावर कारवाई केली पाहिजे.’’ या रस्त्यावर किरकोळ अपघात रोज होत आहेत. परंतु गंभीर अपघात झाल्यावरच उपाययोजनांकडे लक्ष दिले जाणार का, असाही प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. 

तातडीने उपाययोजना करणार - राऊत
याबाबत महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत म्हणाले, ‘‘सातारा रस्ता वर्दळीचा आहे आणि त्याला पुरेसा पर्यायी रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे वाहतूक सुरू ठेवूनच काम करावे लागत आहे. तरीही नागरिकांची सूचना जोपासण्यासाठी ठेकेदाराला यापूर्वीही लेखी सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी होत नसेल, तर पुन्हा पाहणी करून कारवाई केली जाईल. मात्र नागरिकांची सुरक्षितता जोपासण्यास महापालिकेचे प्राधान्य आहे. त्यानुसार तातडीने उपाययोजना केल्या जातील.’’ येत्या तीन महिन्यांत पंचमी हॉटेल चौकापर्यंतचे काम पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: marathi news pune news road accident