काँक्रिटीकरणाच्या नावाखाली उधळपट्टी?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

रस्त्यांची कामे करण्यापूर्वी पाणीपुरवठा, सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज लाइन) आणि अन्य संबंधित खात्यांशी चर्चा करून, ही कामे केली जातील. आवश्‍यक त्या भागातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येईल. मात्र, त्यात १२ मीटर रुंदीच्या रस्त्यांचा समावेश राहणार नाही.
- राजेंद्र राऊत, पथ विभागप्रमुख, महापालिका 

पुणे - विविध प्रकल्पांसाठी शहरात रस्ते खोदाईचे सत्र सुरू होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर ररस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सहयादीत तब्बल १४१कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मेट्रो आणि समान पाणीपुरवठा योजनेच्या कामांसाठी ही खोदाई होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे काँक्रिटीकरणाच्या नावाखाली या वर्षात दीडशे कोटींची उधळपट्टी केली जाणार असल्याचे स्पष्ट आहे. दुसरीकडे रस्त्यांची कामे करताना महामेट्रो आणि पाणीपुरवठा विभागांशी समन्वय राखला जाईल, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

शहरात वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या ३५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गांचे काम हाती घेण्यात आले आहे. समान पाणीपुरवठा योजना आणि नदीसुधार योजनेचेही काम सुरू होणार आहे. त्यासाठी शहर आणि उपनगरांमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात खोदाई होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पुढील काही वर्षे रस्त्यांची कामे नव्याने न करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मुख्यत: १२ मीटर रुंदीच्या रस्त्यांसाठी निधी देणार नसल्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. तसेच त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांसाठी संबंधित खात्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

मेट्रो आणि पाणीपुरवठा योजनेअंतगत होणाऱ्या खोदाईमुळे रस्त्यांची कामे करू नयेत, अशी मागणीही स्वयंसेवी संस्थांनी लावून धरली आहे. तरीही काही भागांत १२ मीटर रुंदीच्या रस्त्यांची कामे हाती घेतल्याचे उघडकीस आले असून, निविदांआधीच ही कामे होत असल्याचे आढळून आले आहे. त्यात भर म्हणजे सहयादीतून वर्षभरात १४१ कोटी रुपये खर्च करून रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार असल्याचे त्यासाठी असलेल्या तरतुदीवरून स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या उत्पन्नात तूट येणार असल्याने अनावश्‍यक कामांवर खर्च न करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी जाहीर केला होता. मात्र केवळ काँक्रिटीकरणासाठी एवढा निधी वापरला जाणार असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

शहरातील रस्त्यांची लांबी २ हजार २०० किलोमीटर 
सिमेंट काँक्रीटचे रस्ते ५०० किलोमीटर
काँक्रिटीकरणासाठी तरतूद (सहयादी) १४१ कोटी 
समान पाणीपुरवठा योजनेतील खोदाई १ हजार ८०० किलोमीटर  

Web Title: marathi news pune news road concrete municipal loss