शिरसाई उपसा योजना शेतकऱ्यांनी पैसे भरल्याने सुरु होणार- रोहित पवार

संतोष आटोळे
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

जानाई योजनेचा सत्ताधाऱ्यांनी विसर..
दरम्यान या बैठकीबाबत माहिती देताना सुपे गटाचे जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे म्हणाले, शिरसाई योजना कार्यान्वित होत आहे.याचा आनंद वाटतो मात्र त्याचवेळी जानाई उपसा सिंचन योजनेबाबत मात्र सरकारचे या भागातील सत्ताधारी पक्षाचे पुढारी मात्र चकार शब्द बोलायला तयार नाहीत.यापूर्वी योजनेबाबत संबंधितांनी दिलेल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला आहे. असा टोला लगावला.  

शिर्सुफळ : बारामती तालुक्यातील जिरायत भागास वरदान ठरलेली शिरसाई उपसा सिंचन योजना येत्या दोन- तीन दिवसात कार्यन्वित होणार आहे.मात्र सदर योजना कोणाच्याही पुढाकारामुळे सुरु होणार नाही तर संबंधित भागातील शेतकऱ्यांनी स्वताच्या कष्टाच्या पैशातुन थकबाकी भरण्यासाठी पुढाकार घेतल्याने होणार आहे. यामुळे सदर योजनेबाबत सरकारची उदासिनता दिसुन येत आहे. असा आरोप पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी केला. 

याबाबत सविस्तर माहिती अशी कि बारामती तालुक्यातील जिरायत पट्ट्यातील गावांचा शेती सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातुन राबविण्यात आलेल्या शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातुन तालुक्याच्या जिरायत भागाला वरदान मिळाले. सदर योजना ब्रिटीश कालीन शिर्सुफळ तलावावर राबविण्यात आली. यंदा मात्र थकित विजबिलाच्या प्रश्नामुळे योजना कार्यान्वित करण्यात अडचण येत होती. यापार्श्वभूविर संबंधित लाभार्थी गावांमधील शेतकऱ्यांनी थकबाकी पाणीपट्टी भरण्याबाबत स्वता पुढाकार घेवुन एकत्रित पैसे जमा केले व सदर रक्कम योजना सुरु होण्यासाठी संबंधित विभागाकडे भरली आहे. यामुळे योजना दोन दिवसात सुरु होणार आहे. मात्र फक्त शिरसाई डाव्या कालव्यावरील गोजुबावी, उंडवडी कडेपठार, जराडवाडी, बऱ्हाणपुर, साबळेवाडी लाभार्थी गावांनी पैसे भरले आहेत.यामुळे फक्त शिरसाई डावा कालवाच सुरु केला जाणार आहे.उजवा कालवा पैसे न भरल्याने लाभापासुन वंचित राहणार आहे.

दरम्यान पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य जिरायत भागातील सुपे गटाचे जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, पोपट पानसरे, संपत जगताप, गणेश चांदगुडे यांनी पुणे पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता सं.द.चोपडे यांच्यासह शिरसाई योजनेबाबत बैठक घेतली. व यामध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे.याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही योजनेच्या बाबत संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुचना केल्या आहेत. यामुळे येत्या दोन तीन दिवसात योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच शासन उन्हाळी आवर्तन देण्याबाबत उदासिन दिसत आहे.मात्र याबाबतही अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उन्हाळी आवर्तनासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. यासाठी आगामी काळामध्ये शिरसाई डावा व उजवा या दोन्ही कालव्यांवरील शेतकऱ्यांनीही थकबाकी भरण्याचे आवाहन त्यांनी केले. 

जानाई योजनेचा सत्ताधाऱ्यांनी विसर..
दरम्यान या बैठकीबाबत माहिती देताना सुपे गटाचे जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे म्हणाले, शिरसाई योजना कार्यान्वित होत आहे.याचा आनंद वाटतो मात्र त्याचवेळी जानाई उपसा सिंचन योजनेबाबत मात्र सरकारचे या भागातील सत्ताधारी पक्षाचे पुढारी मात्र चकार शब्द बोलायला तयार नाहीत.यापूर्वी योजनेबाबत संबंधितांनी दिलेल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला आहे. असा टोला लगावला.  

Web Title: Marathi news Pune news Rohit Pawar Shirdai scheme