रंगीबेरंगी गुलाबांच्या दुनियेत तरुणाई रममाण 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

पुणे : पिवळा, लाल, गुलाबी अन्‌ केशरी अशा रंगीबेरंगी गुलाबांच्या दुनियेत शनिवारी तरुणाई रममाण झाली. वैविध्यपूर्ण गुलाब पाहून प्रत्येकाचे चेहरे आनंदाने खुललेच; पण त्या जोडीला गुलाबाची आरास आणि पुष्परचनेने आकर्षित केले. निमित्त होते 'दि रोझ सोसायटी ऑफ पुणे'तर्फे आयोजित 'गुलाब प्रदर्शना'चे. 

पुणे : पिवळा, लाल, गुलाबी अन्‌ केशरी अशा रंगीबेरंगी गुलाबांच्या दुनियेत शनिवारी तरुणाई रममाण झाली. वैविध्यपूर्ण गुलाब पाहून प्रत्येकाचे चेहरे आनंदाने खुललेच; पण त्या जोडीला गुलाबाची आरास आणि पुष्परचनेने आकर्षित केले. निमित्त होते 'दि रोझ सोसायटी ऑफ पुणे'तर्फे आयोजित 'गुलाब प्रदर्शना'चे. 

प्रदर्शनाचे उद्‌घाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते शनिवारी झाले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक, सोसायटीच्या अध्यक्षा चंद्रलेखा जगताप, अरुण पाटील आणि आशिष नाईक या वेळी उपस्थित होते. यानिमित्ताने सुप्रिया गाडगीळ यांना 'लक्ष्मीबाई अनंत नाईक रौप्यपदक' प्रदान करण्यात आला, तर शेतकरी सचिन पाटील यांना प्रगतीतील शेतकरी पुरस्कार दिला. 

टिळक म्हणाले, ''पुण्यात 188 उद्याने आहेत. त्याची देखभाल करणे आज अवघड काम बनले आहे. बऱ्याच वेळेला असे वाटते, की नवी उद्याने उभारावीत. पण, उद्यानांचे हाल पाहून हा निर्णय मागे घ्यावा लागतो. आज उद्याने विकसित करण्याचा ट्रेंड वाढला आहे. नव्या संकल्पनेनुसार उद्यानांची निर्मिती होत असून, नवीन संकल्पनेवरील उद्यानांची निर्मिती व्हायला हवी. आज गुलाबाचे क्षेत्र वाढले आहे. कष्ट, जिद्द आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर शेतकरी नवनवीन गुलाबांची निर्मिती करत आहेत. आपण त्यांच्याकडून काहीतरी शिकले पाहिजे. आज गुलाबप्रेमीही शहरात मोठ्या प्रमाणात आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे शहरातील जैवविविधतेवर परिणाम होत आहे. त्याला जपण्यासाठी महापालिका नवीन उपक्रम राबवीत आहे.'' 

डॉ. टिळक यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रदर्शनात देशविदेशांतील गुलाब पाहायला मिळणार आहेत. तसेच, राज्यभरातील गुलाबाच्या नव्या जातीही पाहता येतील. प्रदर्शनात विविध रंगांतील आणि आकारांतील दोन हजारहून अधिक गुलाब मांडण्यात आले आहेत. प्रदर्शनातील 16 स्टॉल्समध्ये गुलाबांसह बागेच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य, खत, बिया, औषधे आणि वृक्षारोपणासाठीचे साहित्यही आहेत. राज्यभरातील गुलाब उत्पादकांनी यात सहभाग घेतला आहे. गुलाबपुष्पांबरोबर उत्कृष्ट पुष्परचना पाहायला मिळतील. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. 18) सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत टिळक स्मारक मंदिर येथे पाहावयास खुले आहे.

Web Title: marathi news pune news The Rose Society