गोष्टींच्या अनोख्या दुनियेत बच्चे कंपनी रमली 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

पुणे : जंगलातील रहस्यमय विश्‍व... एकमेकांत असणारी मैत्री... यावर आधारित एकामागोमाग एक गोष्टी साभिनय सादर करणारे देश-विदेशातील स्टोरी टेलर्स... अन्‌ तितक्‍याच उत्सुकतेने गोष्टीत रमलेली बच्चे कंपनी. क्षणाक्षणाला वाढत जाणारी उत्सुकता... अन्‌ गोष्टीतील एखादे पात्र बनून प्रत्यक्षात सहभागी होत लुटलेला आनंद, अशा जल्लोषपूर्ण वातावरणात शनिवारी बच्चे कंपनी गोष्टींच्या अनोख्या दुनियेत रमली. 

पुणे : जंगलातील रहस्यमय विश्‍व... एकमेकांत असणारी मैत्री... यावर आधारित एकामागोमाग एक गोष्टी साभिनय सादर करणारे देश-विदेशातील स्टोरी टेलर्स... अन्‌ तितक्‍याच उत्सुकतेने गोष्टीत रमलेली बच्चे कंपनी. क्षणाक्षणाला वाढत जाणारी उत्सुकता... अन्‌ गोष्टीतील एखादे पात्र बनून प्रत्यक्षात सहभागी होत लुटलेला आनंद, अशा जल्लोषपूर्ण वातावरणात शनिवारी बच्चे कंपनी गोष्टींच्या अनोख्या दुनियेत रमली. 

स्वत:च्या विश्‍वात रमणारी बच्चे कंपनी 'सकाळ इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल'च्या निमित्ताने गोष्टींच्या दुनियेत रमून गेली होती. 'सकाळ वायआरआय' आणि 'यंग बझ क्‍लब'तर्फे आयोजित महोत्सवाचे उद्‌घाटन शनिवारी फिनिक्‍स मार्केटसिटी पुणेचे संचालक राजीव मल्ला, 'सकाळ'च्या इव्हेंट विभागाचे वरिष्ठ सरव्यवस्थापक राकेश मल्होत्रा यांच्या उपस्थित झाले. 

Sakal International Story Telling Festival
विमाननगर : 'सकाळ इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टीव्हल'च्या उद्‌घाटनप्रसंगी राजीव मल्ला यांचा सत्कार करताना राकेश मल्होत्रा

महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लहान मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. अभ्यासापलीकडे मज्जा-मस्ती करत गोष्टी ऐकण्याचा अनोखा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. महोत्सवात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आठ स्टोरी टेलर्सकडून गोष्टी ऐकण्यात बच्चे कंपनी रममाण झाली होती. पूर्वप्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना जुमायनी आरिफ (मलेशिया) आणि मेबल ली (सिंगापूर) यांनी, पहिली ते तिसरीतील विद्यार्थ्यांना हेलन नमाय आणि जॉन म्युकेनी नमाय (केनिया) यांनी, चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांना स्युंग आ किम (साउथ कोरिया), जिवा रघुनाथ (भारत) यांनी आणि आठवी व त्यापुढील विद्यार्थ्यांना लिलियन पॅंग (ऑस्ट्रेलिया), मारियान ख्रिस्तीनसन (डेन्मार्क) यांनी साभिनय गोष्टी सांगितल्या. या वेळी मुलांना सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कोरिया, केनिया, मलेशिया अशा विविध देशांमधील स्टोरी टेलर्सकडून गोष्टी ऐकायला मिळाल्या. रंजकपणे गोष्टी सांगत असताना स्टोरी टेलर्स विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेत होते, त्यामुळे विद्यार्थ्यांमधील उत्सुकता क्षणोक्षणी वाढत होती. 

Sakal International Story Telling Festival
विमाननगर : पपेट शोच्या माध्यमातून गोष्ट सांगताना ऑस्ट्रेलियातील लिलियन पांग

नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल, डॉन बॉस्को स्कूल, एपीफनी इंग्लिश मीडियम स्कूल, सीएम इंटरनॅशनल स्कूल, सनशाईन इंटरनॅशनल स्कूल, ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल आणि सी. पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूल या शाळांमधील दीड हजारांहून अधिक विद्यार्थी महोत्सवात सहभागी झाले होते. 

Sakal International Story Telling Festival
गोष्टीतील एखादे पात्र रंगविताना, त्यात लहान मुलांनाही अभिनयाद्वारे रंग भरण्याचा आनंदाची अनूभुती मिळणं...काही औरच!! असाच हा गोष्टी सांगण्याचा अनुभव घेत बच्चे कंपनीला गोष्टीच्या दुनियेची सफर घडवून आणणारा हा क्षण

सकाळ इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी शहरातील जवळपास दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. फिनिक्‍स मार्केटसिटी नेहमीच असे अभिनव उपक्रम करत असते. 'सकाळ माध्यम समूहा' समवेत हा महोत्सव साजरा करताना आम्हाला आनंद होत आहे. 
- राजीव मल्ला, संचालक, फिनिक्‍स मार्केट सिटी, पुणे 

गोष्टी ऐकण्यात लहानमुले रमून जातात. 'सकाळ'च्या माध्यमातून शहरातील लहान मुलांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टोरी टेलर्सकडून गोष्टी ऐकण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांना गोष्टीत सहभागी करून घेऊन हावभाव करत गोष्टी सांगण्याची ही अनोखी पद्धत मुलांना भावत असल्याचे पाहायला मिळते. 
- मेघा दोडेजा, सेंटर हेड ऍडमिन, गोयंका इंटरनॅशनल स्कूल 

जगभरातील नामवंत स्टोरी टेलर्सकडून रंजकपणे गोष्टी ऐकण्याचा आनंद मुलांना 'सकाळ'च्या माध्यमातून लुटता येत आहे. गोष्टी सांगण्याची प्रत्येकाची वेगळी खासियत आहे. अशा प्रकारे हावभाव करून सांगितलेल्या गोष्टी मुलांच्या कायम स्मरणात राहतात. गोष्टी सांगताना चेहऱ्यावर असणारे भाव अधिक महत्त्वाचे असतात. 
- डॉ. कांचन देशपांडे, मुख्याध्यापिका, नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल 

सकाळ इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल ही संकल्पनाच अभिनव आहे. नावीन्यपूर्ण, ऊर्जा निर्माण करणारा हा महोत्सव आहे. मुलांना मुळात गोष्टी ऐकायला आवडतात. एखादी गोष्ट रंगून सांगितल्यास मुले अधिकाधिक खुलत जातात. 
- सुकन्या जगताप, मुख्याध्यापिका, सनशाइन प्री प्रायमरी स्कूल 

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया... 
अफान रौफ सिद्घीकी (एपीफनी इंग्लिश मीडियम स्कूल) :
या महोत्सवात देश-विदेशातील स्टोरी टेलर्स खूप छान पद्धतीने गोष्ट समजावून सांगत आहेत. अशा पद्धतीने गोष्टी ऐकायला खूप आवडते. 

अंशिता कदम : (सनशाइन प्री प्रायमरी स्कूल) : मला गोष्टी ऐकायला आवडते. वेगवेगळे लोक आम्हाला गोष्टी रंगवून सांगत असल्यामुळे खूप मस्त वाटत आहे.

Sakal International Story Telling Festival
गोष्ट सांगताना त्यात मुलांनाही सहभागी करुन घेताना केनियातील स्टोरी टेलर जॉन म्युकेनी नमाय

Web Title: marathi news pune news Sakal International Story telling festival