मुलांसमवेत पालकांनीही घेतला गोष्टींचा आनंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

पुणे - नदीकिनारा पार करण्यासाठी धडपडणारा "माउस डिअर'... स्वतःच्या जगात रमणारा आणि अत्यंत आळशी असणारा "जॅक'...पाऊस न आल्याने तहानलेल्या प्राण्यांनी केलेली प्रार्थना...अशा असंख्य गोष्टींचे स्टोरी टेलर्संनी केलेले साभिनय सादरीकरण, त्याला विविध आवाज काढत, नकला करत लहान मुलांनी दिलेली उत्स्फूर्त दाद, अशा गोष्टींच्या दुनियेचा अनुभव लहान मुलांसमवेत पालकांनी रविवारी घेतला.

पुणे - नदीकिनारा पार करण्यासाठी धडपडणारा "माउस डिअर'... स्वतःच्या जगात रमणारा आणि अत्यंत आळशी असणारा "जॅक'...पाऊस न आल्याने तहानलेल्या प्राण्यांनी केलेली प्रार्थना...अशा असंख्य गोष्टींचे स्टोरी टेलर्संनी केलेले साभिनय सादरीकरण, त्याला विविध आवाज काढत, नकला करत लहान मुलांनी दिलेली उत्स्फूर्त दाद, अशा गोष्टींच्या दुनियेचा अनुभव लहान मुलांसमवेत पालकांनी रविवारी घेतला.

लहान मुलांच्या विश्‍वात डोकावत असताना, त्यात समरस होऊन जाण्याची अनुभूती असंख्य पालकांना "सकाळ इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल'च्या निमित्ताने आली. "सकाळ वायआरआय' आणि "यंग बझ क्‍लब'ने आयोजिलेल्या दोनदिवसीय महोत्सवाचा समारोप रविवारी झाला. यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील जवळपास आठ स्टोरी टेलर्सकडून प्रत्यक्ष गोष्टी ऐकण्याबरोबर वेगवेगळ्या उपक्रमांमध्येही लहान मुलांसमवेत सहभागी होण्याची अनोखी संधी पालकांनी घेतली. शॅडो अन्य पपेट, कॉस्च्युम, पेपर स्टोरीज अशा विविध प्रकारांतून महोत्सवात कथा सादर झाल्या.

मुलांच्या वयाचा विचार करून गोष्ट सांगण्याची एक विशिष्ट पद्धत, शब्द आणि कृतीचा संगम हे या महोत्सवाचे अनोखे वैशिष्ट्य होते. रविवारची सुटी असल्याने मुलांसमवेत पालकांनीही खाली बसून या गोष्टी ऐकण्याचा आनंद घेतला आणि ते लहानांच्या अनोख्या विश्‍वात रमून गेले. जुमायनी आरिफ, मेबल ली, हेलन नमाय, जॉन म्युकेनी नमाय, स्युंग आ किम, जिवा रघुनाथ, लिलियन पॅंग, मारियान ख्रिस्तीनसन या स्टोरी टेलर्संनी गोष्टी सांगितल्या. महोत्सवाच्या समारोपप्रसंगी सर्व स्टोरी टेलर्सने छोटे-छोटे सादरीकरण केले.

लहान मुलांवर गोष्टींचा प्रभाव पडत असतो. गोष्टीच्या साह्याने एखादा अवघड विषय त्यांना समजावून सांगता येतो. गोष्टींमुळे लहान मुलांचा शब्दसंग्रह, संवाद कौशल्य, समोरच्याचे ऐकण्याच्या वृत्तीत वाढ होते. त्याचबरोबर डिजिटल गेम्सच्या कृत्रिम जगात गोष्टी ऐकण्याची अनुभूती या महोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांना मिळाली आहे.
- साजिद अली, उपाध्यक्ष, लिटिल मिलेनियम

आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टोरी टेलर्सकडून गोष्टी ऐकण्याचा हा अनुभव खूप छान आहे. "स्टोरी टेलिंग' महोत्सव ही नावीन्यपूर्ण आणि अभिनव संकल्पना आहे. साभिनय गोष्टी ऐकण्याचा अनुभव लहान मुलांना वृद्धिंगत करणारा आहे.
- निधीन कोरथ, पालक

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया...
तन्वी पाटील - महोत्सवातील स्टोरी टेलर्स खूप छान पद्धतीने गोष्टी सांगतात. त्यामुळे खूप मज्जा येते. त्यांच्यासमवेत आम्हीपण गोष्टी सांगायला लागतो. वेगवेगळे आवाज काढतो. खूप धम्माल करतो.

वेदांत पाटील - मी माउस डिअरची गोष्ट ऐकली. स्टोरी टेलरने रंगवून ही गोष्ट सांगितली, त्यामुळे मला ती खूप आवडली. गोष्टी ऐकायला खूप आवडते.

Web Title: marathi news pune news sakal international story telling festival