संभाजी ब्रिगेडच्या विरोधानंतर कोंडदेवांची प्रतिमा हटविली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कार्यकर्ते महापालिका आवारात आले आणि दोन संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. प्रविण धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत दादोजी कोंडदेव यांचा फोटो त्वरित हटविण्याची मागणी केली. थोड्यावेळाने ब्राम्हण महासंघाने दादोजी कोंडदेव यांचा फोटो महापालिकेच्या आवारातून काढून बाहेर नेला.

पुणे : लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविल्यानंतर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून महापालिकेच्या आवारातच दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याला संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने दोन तासांतच दादोजी कोंडदेवांची प्रतिमा हटविण्यात आली.

पुणे महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असताना दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लाल महालातून हटविण्यात आला होता. पुतळा हटवल्यानंतर ब्राम्हण महासंघाची अशी मागणी होती, की पुण्यात कोठे तरी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा बसवावा. महापालिकेने तसे आश्वासन देखील दिले होते. म्हणून मनपा अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी आज (बुधवार) त्यांच्या पुण्यतिथी दिनी मनपा आवारात कोंडदेवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कार्यकर्ते महापालिका आवारात आले आणि दोन संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. प्रविण धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत दादोजी कोंडदेव यांचा फोटो त्वरित हटविण्याची मागणी केली. थोड्यावेळाने ब्राम्हण महासंघाने दादोजी कोंडदेव यांचा फोटो महापालिकेच्या आवारातून काढून बाहेर नेला. त्यानंतर तणाव निवळला. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाला महापौर मुक्ता टिळक आणि आमदार मेधा कुलकर्णी यांचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला.

Web Title: Marathi news Pune news Sambhaji Brigade oppose Dadoji Konddev and Brahman Mahasangh