संदीपला अखेर मिळाले अपंगत्वाचे प्रमाणपत्र

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

‘सकाळ’ तसेच कनोजिया यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळेच मला विशेष बाब म्हणून अपंगत्व प्रमाणपत्र मिळू शकले. आता मला किमान सरकारी योजनांचा लाभ मिळू शकेल.
- संदीप नाईक

पौड रस्ता - असाध्य आजारपणामुळे हाडे ठिसूळ झाल्याने अंथरुणाला खिळून असलेल्या जिद्दी संदीप नाईकला अखेर ससून रुग्णालयाकडून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. स्वाभिमानाने जगण्यासाठी पतंग बनवणे, गणेशमूर्ती रंगविणे अशी कामे करून अपंगत्वाशी दोन हात करणाऱ्या संदीपला अपंगत्व प्रमाणपत्र नसल्यामुळे सरकारी योजनांपासून वंचित राहावे लागत होते. 

अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवायचे असेल, तर ससूनमध्ये प्रत्यक्ष जावे लागते. विशिष्ट प्रकारच्या आजारपणामुळे संदीपची हाडे ठिसूळ झाली आहेत.

प्रमाणपत्रासाठी त्याला ससूनला उचलून न्यायचे तर एखादे हाड तुटण्याची भीती होती, त्यामुळे अपंगत्व असूनही प्रमाणपत्र मिळत नव्हते. तरीही त्याची खंत न मानता संदीप अपंगत्वाशी दोन हात करीत इतरांना प्रेरणा देत होता. गणेशमूर्ती रंगविणे, पतंग बनवणे यांसारखी कामे करून तो चार पैसे कमवतो आहे.  

संदीपची जिद्द, सकारात्मकता याची माहिती देणारा लेख ‘सकाळ’ने प्रसिद्ध केला होता. हा लेख वाचून अनेकांनी संदीपला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या वेळी संदीपने, ‘मला अपंगत्व प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मदत करा’, असे आवाहन केले होते. प्रमाणपत्र देण्यातील तांत्रिक अडचण दूर करावी म्हणून मनसेचे कार्यकर्ते प्रशांत कनोजिया, अवयवदान मोहीम राबविणारे डॉ. रोहित बोरकर यांनी याबाबत ससूनचे वैद्यकीय अधिकारी, पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आणि संदीपला अखेर प्रमाणपत्र मिळाले. यासाठी कनोजिया यांनी संदीपच्या व्हिडिओ क्‍लीप, डॉक्‍टरांचे रिपोर्ट ससूनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांपुढे सादर केले होते.

Web Title: marathi news pune news sandip naik handicapped certificate