गरजू महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्यासाठी विशेष मोहीम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

गरजू महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन पुरविण्याच्या मोहिमेला सहकार्य करण्यासाठी बचत गटांनीही प्रतिसाद दिला आहे. राजकीय क्षेत्रासह नोकरी आणि व्यवसाय करीत असलेल्या 50 ते 60 महिला एकत्र आल्या आहेत. त्या महिन्याकाठी पाचशे रुपये जमा करतील. त्यातून नॅपकिनची खरेदी करण्यात येणार आहे. त्या त्या भागात केंद्र सुरू केले जातील. ज्यामुळे काही महिलांना रोजगार उपलब्ध होतील. 
- राणी भोसले, अध्यक्ष, महिला व बालकल्याण समिती, महापालिका 

पुणे : शहरातील सर्वच घटकांतील महिलांना सहजासहजी "सॅनिटरी नॅपकिन' उपलब्ध करून देण्याकरिता महिला बचतगटाच्या पुढाकारातून "ती'च्याकरिता-आम्ही साऱ्याजणी' ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतून झोपडपट्ट्या मुख्यतः आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील महिला आणि युवतींना मोफत "सॅनिटरी नॅपकिन' पुरविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात दर महिन्याला सुमारे दोनशेहून अधिक महिलांना सामावून घेण्यासाठी नॅपकिनची व्यवस्था केली जाणार असून, पुढील आठवड्यापासून या मोहिमेला सुरवात होणार आहे. 

विशेष म्हणजे, या मोहिमेअंतर्गत गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील 50 महिला पुढे आल्या आहेत. मोहिमेची व्याप्ती वाढविण्याकरिता "सोशल मीडिया'च्या माध्यमातून आणखी महिलांना एकत्र आणले जात आहे. या सर्व महिला दरमहा प्रत्येकी पाचशे रुपये जमवून गरजू महिलांना नॅपकिन पुरवतील. याबाबत महापालिकेतील अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, महापालिकेचेही सहकार्य घेतले जाणार आहे, असे मोहिमेच्या समन्वयक आणि महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष राणी भोसले यांनी सांगितले. 

झोपडपट्ट्यांमधील महिलांमध्ये नॅपकिनबाबत जागृती व्हावी, या उद्देशाने "तिच्याकरिता-आम्ही साऱ्याजणी' ही मोहीम सुरू केली आहे. परंतु, अनेकजणी केवळ आर्थिक अडचणीमुळे नॅपकिन वापरत नसल्याचे पाहणीत आढळून आले. त्यात, युवतींचाही समावेश आहे. नॅपकिनचा वापर होत नसल्याने महिला आणि युवतींच्या आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे केवळ जागृतीचा उपाय न करता नेमक्‍या समस्या समजून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न आहे. या पार्श्‍वभूमीवर सामाजिक दायित्व म्हणून विविध क्षेत्रातील महिलांना एकत्र आणून गरजू महिलांना मोफत नॅपकिन देण्याचा विचार पुढे आला, असे भोसले यांनी सांगितले. 

गरजू महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन पुरविण्याच्या मोहिमेला सहकार्य करण्यासाठी बचत गटांनीही प्रतिसाद दिला आहे. राजकीय क्षेत्रासह नोकरी आणि व्यवसाय करीत असलेल्या 50 ते 60 महिला एकत्र आल्या आहेत. त्या महिन्याकाठी पाचशे रुपये जमा करतील. त्यातून नॅपकिनची खरेदी करण्यात येणार आहे. त्या त्या भागात केंद्र सुरू केले जातील. ज्यामुळे काही महिलांना रोजगार उपलब्ध होतील. 
- राणी भोसले, अध्यक्ष, महिला व बालकल्याण समिती, महापालिका 

Web Title: Marathi news Pune news sanitary napkin for womens