पुणे : मांजरीत सरपंच पदासाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये लढत

कृष्णकांत कोबल
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

मांजरी (पुणे) : मांजरी बुद्रुकमध्ये राष्ट्रवादी-भाजप तर शेवाळवाडीत राष्ट्रवादीच्याच दोन गटात सरपंच पदाची निवडणूक रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. ज्या गटाचा सरपंच त्याचेच वर्चस्व ग्रामपंचायतवर राहणार असल्याची चर्चा येथे रंगली आहे. त्यामुळे हे मानाचे पद आपल्याकडेच कसे राहील यासाठी दोन्हीही गावात जोरदार मोर्चे बांधणी सध्या सुरू आहे. येथील मांजरी बुद्रुक व शेवाळवाडी या दोन गावांच्या पोटनिवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. 

सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सरकारच्या नवीन धोरणानुसार सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने संभाव्य उमेदवारांनी आधी पासूनच तशी तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यावेळी भाजपने आव्हान देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे येथील निवडणूकीकडे नागरिकांकडून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशा दृष्टिकोनातूनच पाहिले जात आहे. शहराला लागून असलेली सर्वात मोठी ग्रामपंचायत, राष्ट्रवादीचे नेते सुरेश घुले व आमदार योगेश टिळेकर यांच्या मतदार संघातील गाव म्हणून राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या नजरा या गावच्या निवडणूकीकडे लागल्या आहेत. 

घुले यांच्या गटाकडून त्यांचे बंधू कैलास घुले यांचे तर टिळेकर यांच्या गटातून शिवराज घुले यांची नावे सरपंच पदाचे उमेदवार म्हणून पक्की झाल्याचे समजते. त्यामुळे सरपंच पदासाठी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होण्याचे चिन्ह येथे दिसते. 
सतरा सदस्य व एक सरपंच अशा अठरा जागांसाठी ही निवडणूक होत आहे. मात्र, सध्या सरपंच पदाच्या दृष्टीने दोन्हीही प्रमुख गटाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर सदस्य पदाच्या उमेदवारांचा मेळ घातला जाईल असे दिसते. 

शेवाळवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्याच दोन गटात निवडणूक रंगणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विक्रम शेवाळे व जिल्हा युवकचे माजी अध्यक्ष राहुल शेवाळे या दोघांच्या गटातून जाहीर होणारे उमेदवार एकमेकांसमोर आव्हान उभे करणार आहेत. त्यामुळे याही ग्रामपंचायतीकडे परिसराचे लक्ष लागले आहे. 

ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आजही सर्व्हरचा व्यत्यय आला. लींक सुरू होत नसल्याने इच्छुक उमेदवारांपैकी अनेकांना आज चौथ्या दिवशीही अर्ज दाखल करता आला नाही. ऐन निवडणूकीतच मोठा वेळ वाया जात असल्याने इच्छुक उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Web Title: Marathi news pune news sarapnch election rashtaravadi bjp