योजना राबविण्यासाठी ग्रामस्थांची साथ महत्त्वाची - बी. गणेश

जनार्दन दांडगे
मंगळवार, 13 मार्च 2018

उरुळी कांचन (पुणे) : खाजगी किंवा सरकारी संस्थांमार्फत गावाच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात, मात्र त्या राबविण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांची साथ असणे गरजेचे असते असे मत एचएसबीसी बँकेचे रिटेल बँकिंग आणि वेल्थ मॅनेजमेंट विभागप्रमुख बी. गणेश यांनी शिंदवणे (ता. हवेली) येथे मांडले.

उरुळी कांचन (पुणे) : खाजगी किंवा सरकारी संस्थांमार्फत गावाच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात, मात्र त्या राबविण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांची साथ असणे गरजेचे असते असे मत एचएसबीसी बँकेचे रिटेल बँकिंग आणि वेल्थ मॅनेजमेंट विभागप्रमुख बी. गणेश यांनी शिंदवणे (ता. हवेली) येथे मांडले.

भारतीय कृषी विकास अनुसंधान प्रतिष्ठान (बायफ) व एचएसबीसी सॉफ्टवेअर कंपनी यांच्या वतीने शिंदवणे येथे उभारण्यात आलेल्या संत यादवबाबा शुद्ध पाणी पुरवठा सयंत्राचे उद्घाटन बी. गणेश यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बायफ संस्थेचे अध्यक्ष गिरीश सोहनी होते. यावेळी एचएसबीसी टेक्नॉलॉजीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भार्गवी पिरीयाला, एचटीएसचे मुख्य वित्त अधिकारी प्रसाद रवी, पुणे विभागीय अधिकारी गिरीश बिंदानी, बायफ संस्थेचे उपाध्यक्ष बी. के. काकडे, मुख्य प्रकल्प समन्वयक राकेश वारियर, प्रकल्प व्यवस्थापक सुरज कुमार, अतिरिक्त प्रकल्प समन्वयक मानसिंग कड, सरपंच गणेश महाडिक, उपसरपंच आण्णासाहेब शितोळे, माजी उपसरपंच प्रवीण देशमुख, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नानासाहेब महाडिक, माजी अध्यक्ष मुकेश महाडिक, उपस्थित होते. 

यावेळी बी. गणेश म्हणाले, "गावामध्ये होणारे साथीचे आजार टाळण्यासाठी पिण्याच्या स्वच्छ पाण्याबरोबर परिसराची स्वच्छता गरजेची आहे. एचएसबीसी समूह व बायफ संस्थेच्या मदतीने अनेक गावामध्ये होणाऱ्या विकास कामांमुळे त्या त्या गावाच्या वैभवात भर पडली आहे. त्याचप्रमाणे स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या परिसराची स्वच्छता ठेवून विकासकामे करणाऱ्या संस्थांना सहकार्य करणे अपेक्षित आहे."

यावेळी गिरीश सोहनी म्हणाले, "बायफ संस्थेच्या वतीने उरुळी कांचन व परिसरातील गावांमध्ये विविध विकास कामे केली जातात यामध्ये कमी खर्चात शौचालय युनिट, रेन वॉटर हार्वेस्टिंग साहित्य, बंदिस्त गटार योजना, शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये बि-बियाणे, शेती अवजारे व जनावरांसाठी लसीं पुरवल्या जातात. सध्या एचएसबीसी सॉफ्टवेअर कंपनीच्या वतीने १५ गावांमध्ये शुद्ध पाणी पुरवठा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या पाणी पुरवठा प्रकल्पातून मिळणारा आर्थिक फायदा त्या त्या गावांमध्ये विकासाची कामे करण्यासाठी वापरण्यात येत आहे. भविष्यकाळातील पाण्याची समस्या लक्षात घेवून पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करावा तसेच सांडपाण्यापासून परसबाग फुलवावी."

दरम्यान एचएसबीसी सॉफ्टवेअर कंपनी व बायफ संस्थेच्या पथकाने उरुळी कांचन परिसरातील गावांमध्ये मागील काही महिन्यांच्या काळात उभारलेल्या शुद्ध पाणी पुरवठा प्रकल्प, बंदिस्त गटार योजनांची पाहणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब महाडिक यांनी केले तर आभार संत यादवबाबा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश कांचन यांनी मानले.

Web Title: Marathi news pune news schemes execution villagers support