पुणे अंधशाळा स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

संदीप जगदाळे
गुरुवार, 8 मार्च 2018

कृष्णा शेवाळे म्हणाले, खरं तर मुलांच्या क्षमतेचा आपल्याला अंदाज नसतो. शालेय सहभागातून स्नेहसंमेलनासारखे सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, विविध उपक्रम यांमधील सहभाग विशेष मुलांसाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण त्या अनुभवामुळे त्यांच्यातील क्षमतांची चुणूक दिसून येते. या मुलांचा आवाका, त्यांची आवड व समज लक्षात घेऊन कार्यक्रमाची आखणी शाळा करते. 

हडपसर : शालेय जीवनातील आनंद मेळा म्हणजे शाळेचे स्नेहसंमेलन. जून महिन्यातील शालेय दिवसाची सुरुवात ही प्रत्येक विद्यार्थी व पालक यांच्यासाठी एक नवनवीन ज्ञानाची दारे खुली करून देणारी असते. प्रत्येक पालकाचे आपल्या पाल्याकडून काही अपेक्षा असतात. आपला मुलगा हा पुस्तकी अभ्यासाबरोबरच इतर कलांमध्येही त्याने आपला सहभाग वाढवावा म्हणून प्रत्येक पालक प्रयत्नशील असतो. शाळेव्यतिरिक्त अन्य उप्रक्रमांमधील त्याचा सहभाग हा त्याच्या इतर आवडी-निवडी आपल्याला दाखवत असतो, यासाठी पुणे अंधशाळा राबवत असलेले उपक्रम महत्वाचे आहेत, असे मत सामाजिक कार्यकर्ते विश्वशांती इंटरनॅशनल फौंडेशनचे प्रमुख व योगगुरू डॉ. दत्ता कोहीणकर यांनी व्यक्त केले.

पुणे अंधशाळा (मुलांची) येथे आयोजीत केलेल्या वार्षीक स्नेहसंमेलनात कोहिणकर बोलत होते. याप्रसगी प्रशासकीय अधिकारी कृष्णा शेवाळे, नगरसेविका हेमलता मगर, प्राचार्य चंद्रकांत भोसले, उपस्थित होते. 

हेमलता मगर म्हणाल्या, शालेय स्नेहसंमेलन म्हणजे मुलांची क्षमता, त्यांची आवड- निवड लक्षात घेऊन वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये केली गेलेली निवड. मुलांचे वाचन, पठण, सादरीकरण चांगले असेल तर त्यांना वेगवेगळ्या नाटुकल्या देऊन वेगवेगळे सामाजिक किंवा ऐतिहासिक विषय मांडणे हा स्नेहसंमेलनांचाच एक भाग असतो. ज्यांना नृत्याची आवड आहे अशा विद्यार्थ्यांना विविध पारंपरिक किंवा नवीन नृत्यांमध्ये भाग घेण्यास संधी दिली जाते. तर गायनाची आवड असणा-या मुलांना सामूहिक गायन स्पर्धेत भाग घेण्यास प्रवृत्त केले जाते. त्यासाठी पुणे अंधशाळा नेहमीच प्रयत्न करते याचा अभिमान वाटतो.

कृष्णा शेवाळे म्हणाले, खरं तर मुलांच्या क्षमतेचा आपल्याला अंदाज नसतो. शालेय सहभागातून स्नेहसंमेलनासारखे सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, विविध उपक्रम यांमधील सहभाग विशेष मुलांसाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण त्या अनुभवामुळे त्यांच्यातील क्षमतांची चुणूक दिसून येते. या मुलांचा आवाका, त्यांची आवड व समज लक्षात घेऊन कार्यक्रमाची आखणी शाळा करते. 

प्राचार्य चंद्रकांत भोसले म्हणाले, शाळेचे स्नेहसंमेलन म्हणजे आपल्या वेगवेगळ्या लोककला जपणारे आणि त्यातून आपली संस्कृती मुलांना पटवून देणारे एक व्यासपीठ असते. विविध लोककला, कोळीगीते, भांगडा, कथ्थक या सगळ्या नृत्यप्रकारांचा समावेश स्नेहसंमेलनचा एक भाग असतो. प्रत्येक शाळेची व त्यातील शिक्षकांची ही जबाबदारी असते की आपल्या मुलांना चांगल्यातून उत्कृष्ट कसे देता येईल आणि मुलांचे हित कसे साधता येईल हे पाहणे. 

याप्रसंगी ग्रुप कॅपटन कैशल यांच्या हस्ते गुणवंत विदयार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. तसेच विदयार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखीताचे प्रकाशन पाहूण्यांचे हस्ते झाले. मुलांनी तयार केलेल्या कवीतांचे वाचन करण्यात आले. विदयार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांना उपस्थितांनी दाद दिली. 

Web Title: Marathi news Pune news school gathring