शाळा व विद्यार्थी वाऱ्यावर, स्वच्छता व सुरक्षितता दुर्लक्षित

school
school

हडपसर : शिपाई नसल्याने विद्यार्थी व शिक्षकच वर्ग व शाळा परिसराची स्वच्छता करतात. सुरक्षारक्षक नसल्याने शिक्षकांना सुरक्षारक्षकाचे काम करावे लागते. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय नाही. वर्गावर शिक्षकच नसल्याने विद्यार्थी वाऱ्यावर. सार्वजनिक स्वच्छतागृहे तुंबलेली व अस्वच्छ आहेत. काही शाळांना अद्याप शैक्षणिक साहित्य मिळालेच नाही. वर्ग खोल्यांची दारे व खिडक्या तुटलेले आहेत. मैदानावर कचरा व अस्वच्छता, काही वर्गांना शिक्षक व मुख्याध्यापक नाही अशी विदारक परिस्थिती हडपसरमधील महापालिकेच्या शाळांमध्ये आहे. त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता व आरोग्यावर होत आहे. 

हडपसर-मुंढवा सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत महापालिकेच्या एकूण 26 शाळा आहेत. यामध्ये 12 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे. तर बालवाड्यांमध्ये 1600 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मराठी माध्यमाच्या 22, इंग्रजी माध्यमाच्या 3 तर उर्दू माध्यमाची 1 शाळा असून 24 बालवाड्या आहेत. शहरात सर्वाधिक पटसंख्या याच विभागात आहे. मात्र या अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक, सुरक्षारक्षक, शिपाई यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. विदयार्थी व शिक्षकांना वर्ग सोडून वर्ग व परिसराच्या स्वच्छतेसाठी हातात झाडू घ्यावे लागत आहेत. मुख्याध्यापक नसल्याने अनेक शाळांमध्ये शिक्षकांना वर्ग सोडून मुख्याध्यापकाची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. बहुतांश स्वच्छतागृहात पाणी नाही, दारे, फरशा तुटलेल्या आहेत. सुरक्षारक्षक नसल्याने दिवस-रात्र टवाळखोर शाळेच्या प्रांगणात धिंगाणा घालतात. त्यामुळे शिक्षकांनाच वर्ग सोडून या टवाळखोरांवर लक्ष ठेवावे लागत आहे. तसेच रात्रीच्या वेळी या शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न एैरणिवर आला आहे. याबाबत हडपसर-मुंढवा प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे यांनी सर्व शाळांची पहाणी केली, तसेच सर्व मुख्याध्यापकांची बैठक आयोजीत करून परिसरातील शाळांच्या समस्या जाणून घेतल्या. या मुख्याध्यापकांनी त्यांच्यापुढे समस्यांचा पाढा वाचला. 

वरिष्ठ कार्यालयाकडे अनेकदा पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याचे त्यांनी अध्यक्षांना सांगितले. त्यानंतर ससाणे यांनी परिसरातील शाळेत पुरेसे शिक्षक, मुख्याध्याक व शिक्षकेत्तर कर्मचारी मिळावेत यासाठी आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे. तसेच याबाबत पाठपुरावा सुरू केला आहे. 

याबाबत ससाणे म्हणाले, हडपसर-मुंढवा सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या हद्दीतील शाळांध्ये 14 मुख्याध्यापक, 3 पर्यवेक्षक, 6 शिपाई, 10 रखवालदार, 5 बालवाडी शिक्षिका, 11 बालवाडी सेवीकांची पदे रिक्त आहेत. पुरेसे कर्मचारी नसल्याने विद्यार्थी व शिक्षकांना वर्ग व शाळा परिसराची स्वच्छता करावी लागत आहे. सुरक्षा नसल्याने शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर आला आहे, याबाबत तातडीने आवश्यक त्या उपाययोजना व्हाव्यात यासाठी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन दिले आहे. पुढील आठ दिवसात प्रश्न मार्गी लावतो, असे अश्वासन आयुक्तांना त्यांनी दिले आहे. 

याबाबत हडपसर विभागाचे सहाय्यक प्रशाकीय अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग सुरेश उचाळे म्हणाले, सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी केलेल्या मागणीनुसार सर्व मागण्या शिक्षण विभाग प्राथमिक विभागाच्या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे दिले आहे. त्यांनी तातडीने रिक्त पदे भरणे व भौतिक सुविधा पुरविण्यात येतील असे सांगितले आहे. 

महापालिकेचे शिक्षण प्रमुख शिवाजी दौंडकर म्हणाले, मी नुकताच चार्ज घेतला आहे. शाळांमधील भौतिक सुविधांसाठी 28 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. त्यामध्ये हडपसरमधील स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, इमारतीच्या दुरूस्ती करण्यात येणार आहेत. हडपसरमधील शाळांमधील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मार्च महिन्याच्या अखेऱीस सर्व कामे मार्गी लागतील.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com