शाहिरीत नावीन्यता आणावी : रानडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

"मला शाहिरीने घडवले. शाहिरीमुळे मी खूप काही करू शकलो. मी पदव्युत्तर शिक्षणही शाहिरीमुळे पूर्ण केले. तिच्यामुळे मी आज आयुष्यात यशस्वी होऊ शकलो. शाहिरी सादर करताना ती लोकांच्या मनाला भिडली पाहिजे. त्याचे प्रत्यक्ष चित्र डोळ्यासमोर उभे राहायला हवे''.

- अभिनेते श्रीराम रानडे

पुणे : "प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद शाहिरीत असते. म्हणूनच शाहिरी ही प्रत्येकाच्या मनाला भिडते. पण आजकलच्या तरुण शाहिरांनी हे लक्षात घ्यावे, की शाहिरीला पाठांतराची गरज असते. तशीच तिच्या सादरीकरणातही वैविध्य असायला हवे. त्यामुळे तरुण शाहिरांनी तिचा ध्यास घेऊन त्याचे सादरीकरण करावे. काळाप्रमाणे स्वतःला बदलून शाहिरीत नावीन्यता आणावी,' असे आवाहन अभिनेते श्रीराम रानडे यांनी केले. 

महाराष्ट्र शाहीर परिषदेतर्फे देण्यात येणारा "जयराम नारगोलकर पुरस्कार' तरुण शाहीर नयन पिंगलवार यांना रानडे यांच्या हस्ते प्रदान केला. त्या वेळी ते बोलत होते. अभिनेते राघवेंद्र कडकोळ, परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर, विद्याधर नारगोलकर, सतीश वाघमारे, परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश ढवळे, काशीराम दीक्षित, शीतल कापशिकर आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात तरुण शाहिरांनी विविध विषयांवर पोवाडे सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत अशा विषयावर आधारित पोवाडे त्यांनी सादर केले. 

रानडे म्हणाले,"मला शाहिरीने घडवले. शाहिरीमुळे मी खूप काही करू शकलो. मी पदव्युत्तर शिक्षणही शाहिरीमुळे पूर्ण केले. तिच्यामुळे मी आज आयुष्यात यशस्वी होऊ शकलो. शाहिरी सादर करताना ती लोकांच्या मनाला भिडली पाहिजे. त्याचे प्रत्यक्ष चित्र डोळ्यासमोर उभे राहायला हवे. म्हणूनच तरुण शाहिरांनी आपल्या सादरीकरणावर भर द्यावा. शाहिरीचा ध्यास घेऊन ती सादर करावी. त्याच्या कथनाकडेही लक्ष द्यावे.' नारगोलकर आणि पासलकर यांनी मनोगत व्यक्त केले. 

Web Title: Marathi News Pune News in Shahir New things come says Actor Shriram Ranade