शंकरराव पाटील संस्काराचे व्यासपीठ : अशोक शिंदे

Bhigwan
Bhigwan

भिगवण (पुणे) : शंकरराव पाटील यांनी राज्यासह देशपातळीवरील विविध पदे भूषविली परंतु त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. विनम्र स्वभाव, जनतेच्या प्रती असलेली तळमळ यांमधून त्यांनी त्यांच्या संपुर्ण जीवनकाळांमध्ये शिक्षण, सहकार, पुनर्वसन आदी क्षेत्रात कार्याचा मोठा डोंगर उभा केला. राजकारणातील संत असलेले शंकरराव पाटील हे खऱ्या अर्थाने संस्काराचे व्यासपीठ होते असे प्रतिपादन इंदापुर तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले.

येथील कला महाविद्यालय भिगवण व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. शंकरराव पाटील यांचे जयंतीनिमित्त आयोजित यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी पुणे येथील वक्ते मारुती यादव, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य रणजीत भोंगळे, काँग्रेसचे गटनेते संपत बंडगर, माजी उपसरपंच संजय रायसोनी, रोटरी क्लब ऑफ भिगवणचे अध्यक्ष नामदेव कुदळे, नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय चौधरी, प्राचार्य भास्कर गटकुळ, बहिःशाल विभागाचे समन्वयक प्रा. संदीप साठे उपस्थित होते. 

शिंदे पुढे म्हणाले, राज्यासह देशामध्ये अनेक प्रकल्प झाले परंतु उजनी धरणामुळे पुनर्वसन झालेल्या इंदापुरसह इतरही तालु्क्यातील लोकांचे योग्य पुनर्वसन करुन त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती करण्याचे काम शंकरराव पाटील यांनी केले. लोकाभिमुख काम करणाऱ्या शंकरराव पाटील यांचा आदर्श राजकारणांमध्ये व समाजकारणांमध्ये काम करणाऱ्या तरुणांनी घेण्याची आवश्यकता आहे.

यावेळी आनंदाची लयलुट याविषयावर बोलताना मारुती यादव म्हणाले, महापुरुषांनी खूप मोठे काम केले परंतु ते करत असताना त्याचा ताण न घेता आनंद घेतला. शंकरराव पाटील यांनी त्यांच्या जीवनशैलीच्या माध्यमातून अनेकांना सुखी, समाधानी व आनंदी जीवनाचा वस्तुपाठ दिला. आधुनिक जीवनशैलीमध्ये ताण तणाव हा जीवनाचा अविभाज्य घटकच बनला आहे अशावेळी पुस्तकांचे वाचन, व्याख्यानांचे श्रवण व आनंदी क्षणाचा शोध घेत माणसांने जीवनांमध्ये आनंदाची लयलुट केली पाहिजे.

प्रास्ताविकांमध्ये प्रा. संदीप साठे म्हणाले, शंकरराव पाटील यांनी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये व जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान असणाऱ्या नेत्यांसमवेत काम केले. इंदापुर तालुक्यातील हिंगणगांवपासुन भिगवणपर्यंतच्या पुनर्वसनांमध्ये महत्वपूर्ण भुमिका बजावली. सूत्रसंचालन प्रा. शाम सातर्ले यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत चवरे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com