पुण्यातील मांजरीमध्ये नागरिकांची पाण्यासाठी वणवण

कृष्णकांत कोबल
बुधवार, 24 जानेवारी 2018

मांजरी (पुणे) : नादुरूस्त झालेली जलवाहिनी अडीच महिने होऊनही दुरूस्त झाली नसल्याने येथील सोलापूर महामार्ग परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. याबाबत पाणी पुरवठा विभागाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. येथील सोलापूर महामार्ग परिसरातील नागरिकांना पालिकेकडून पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र, लक्ष्मी कॉलनीजवळ जलवाहिनी नादुरूस्त झाल्याने या भागातील पाणी पुरवठा गेली अडीच महिन्यापासून बंद झाला आहे. त्यामुळे येथील साईनाथ कॉलनी, शिवचैतन्य कॉलनी, पी.एस.

मांजरी (पुणे) : नादुरूस्त झालेली जलवाहिनी अडीच महिने होऊनही दुरूस्त झाली नसल्याने येथील सोलापूर महामार्ग परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. याबाबत पाणी पुरवठा विभागाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. येथील सोलापूर महामार्ग परिसरातील नागरिकांना पालिकेकडून पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र, लक्ष्मी कॉलनीजवळ जलवाहिनी नादुरूस्त झाल्याने या भागातील पाणी पुरवठा गेली अडीच महिन्यापासून बंद झाला आहे. त्यामुळे येथील साईनाथ कॉलनी, शिवचैतन्य कॉलनी, पी.एस. व्हिला सोसायटी, स्टड फार्मसह ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रापर्यंतच्या नागरिकांना पाण्यासाठी हडपसर भागात यावे लागत आहे. 

महिलांना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. ड्रेनेज लाईनच्या कामात ही जलवाहिनी नादुरूस्त झाली असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगितले जात आहे. मात्र, ही जलवाहिनी ड्रेनेजच्या कामात नादुरूस्त झाली नसून ती कुणीतरी जाणीवपूर्वक काढून नेली आहे. पाणी पुरवठा विभागाला वारंवार कळवून व आम्ही सुमारे सोळा हजार रूपयांची नवीन जलवाहिनी देवूनही दुरूस्तीचे काम अद्याप झालेले नाही. अशी तक्रार बाळासाहेब भगत, विशाल ढोरे, बाळासाहेब फरांदे, रमजान शेख, रामंचंद्र ढवळे आदी नागरिकांनी केली आहे. हे काम लवकरात लवकर केले जावे, अशी मागणीही या नागरिकांनी केली आहे. 

याबाबत कार्यकारी अभियंता सुभाष पावरा म्हणाले, "ड्रेनेजचे काम सुरू असताना ही जलवाहिनी नादुरूस्त झाली आहे. त्या ठिकाणी नवीन वाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, त्यापुढेही कोठेतरी पाणी गळती होत असल्याने नागरिकांपर्यंत पाणी पोहचत नाही. टॅप घेवून ते शोधण्याचे काम सुरू आहे. शाखा अभियंता इंद्रजित देशमुख यांना त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले आहे. त्यामुळे दोन दिवसात नागरिकांना पाणी मिळू शकेल.''

 

Web Title: Marathi news pune news shortage of water at manjari