त्वचेला न चिकटता जखम भरणारी ‘मलमपट्टी’!

सलील उरुणकर 
गुरुवार, 15 मार्च 2018

पुणे - त्वचेला न चिकटता जखम भरून काढण्यास मदत करणारी ‘मलमपट्टी’ (बॅंडेज) तुम्हाला मिळाली तर, तसेच जखम भरून येण्याच्या प्रक्रियेलाही धक्का न पोचवता पट्टी काढताना कोणतीही वेदना होऊ न देता जर या पट्टीने काम केले तर, होय आता असे उत्पादन वर्षभराच्या कालावधीतच तुमच्या हातात पडू शकणार आहे.

पुणे - त्वचेला न चिकटता जखम भरून काढण्यास मदत करणारी ‘मलमपट्टी’ (बॅंडेज) तुम्हाला मिळाली तर, तसेच जखम भरून येण्याच्या प्रक्रियेलाही धक्का न पोचवता पट्टी काढताना कोणतीही वेदना होऊ न देता जर या पट्टीने काम केले तर, होय आता असे उत्पादन वर्षभराच्या कालावधीतच तुमच्या हातात पडू शकणार आहे.

‘बायोलमेड इनोव्हेशन्स’ या वैद्यकीय-तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअपने ‘इझीपील’ हे उत्पादन हाती घेतले आहे. या व्यतिरिक्त ‘सेरिऑस’ हे बोन ग्राफ्ट सबस्टिट्यूट आणि ‘सेरिमॅट’ हे सॉफ्ट टिश्‍यू रिजनरेशन करणारी दोन उत्पादनेही साधारण दोन वर्षांच्या कालावधीत बाजारात येण्याची शक्‍यता आहे. ही स्टार्टअप राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) शास्त्रज्ञ डॉ. अनुया निसळ यांच्या संशोधनावर आधारित आहे. डॉ. स्वाती शुक्‍ल या ‘टेक्‍नॉलॉजी हेड’ म्हणून काम पाहतात. मागील महिन्यात ‘बायोटेक्‍नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल’कडून (बायरॅक) ‘बायोलमेड’ला दीड कोटी रुपयांचा निधी दिला आहे. ‘सेरिऑस’च्या ‘प्रॉडक्‍ट डेव्हलपमेंट’च्या कामासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. 

या उत्पादनांविषयी अधिक माहिती देताना डॉ. शुक्‍ल म्हणाल्या, ‘‘पदार्थ विज्ञानशास्त्राच्या आधारे नैसर्गिक रेशम प्रथिनांचा वापर करून शरीरात विरघळणारे ‘बायोमेडिकल इम्प्लान्ट्‌स’ आम्ही बनवतो. ‘बायोलमेड इनोव्हेशन्स’च्या शास्त्रज्ञांकडे हे प्रथिन हाताळण्याचे तंत्रज्ञान आहे.

हाडांमध्ये नैसर्गिकरीत्या जखम भरून आणण्याची क्षमता असते. पण, हाडाला ‘फ्रॅक्‍चर’ असल्यास आणि दोन हाडांमध्ये अंतर पडले असल्यास शरीराला ते अंतर भरून काढता येत नाही. ‘सेरिऑस’च्या मदतीने हे अंतर भरून काढणे शक्‍य झाले आहे. सध्या प्राण्यांवर या चाचण्या यशस्वी झाल्या असून, येत्या वर्षभरात माणसांवर चाचण्या घेण्यात येणार आहेत.’’ 

‘सेरिमॅट’ या उत्पादनाचा उपयोग सॉफ्ट टिश्‍यू रिजनरेशनमध्ये होणार आहे. स्तनाच्या कर्करोगामुळे स्तन काढून टाकल्यावर ही हानी भरून काढण्यासाठी आणि स्तन पूर्ववत करण्यासाठी सेरिमॅटचा उपयोग होईल. याशिवाय इतर सॉफ्ट टिश्‍यू रिजनरेशनसाठीदेखील हे उत्पादन उपयुक्त आहे. या उत्पादनासाठी येत्या काही दिवसांत प्राण्यांवर चाचण्या सुरू होणार आहेत. साधारणतः दोन वर्षांत माणसांवरील चाचण्याही पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे डॉ. शुक्‍ल यांनी सांगितले.

‘मलमपट्टी’ची देशांतर्गत बाजारपेठ - २५० कोटी रुपये 
सध्या आयात होणारी ‘न चिकटणारी’ ‘मलमपट्टी’ची उलाढाल - २० कोटी रुपये

Web Title: marathi news pune news skin Injuries bandage