स्मार्ट सिटीच्या वतीने आधुनिक व  उच्च दर्जाची स्वच्छतागृहांची उभारणी

Toilets
Toilets

औंध (पुणे) : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने औंध-बाणेर-बालेवाडी भागात एअरबॉक्स शौचालय हे आधुनिक पद्धतीची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून महिलांसाठी सुविधा आणि सुरक्षितता देण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते या स्वच्छतागृहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, प्रभाग समिती अध्यक्ष विजय शेवाळे, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर व पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

महिलांसाठी १५ आणि पुरुषांसाठी २५ अशी एकूण ४० शौचालये या सेवेत आगामी काळात समाविष्ट करण्यात येणार आहेत. औंध-बाणेर-बालेवाडी भागामध्ये ही शौचालये उपलब्ध करण्याचे आणखी एक स्मार्ट पाऊल उचलण्यात आले आहे. एचडीएफसी बँकेच्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) उपक्रमाअंतर्गत या स्वच्छतागृहांसाठी सहाय्य करण्यात येत आहे. यातील एका स्वच्छालयामध्ये किमान चार व्यक्तींसाठी स्वतंत्र शौचालयाची सुविधा असून, त्याचा एकूण खर्च अंदाजे  १२ लाख रुपये एवढा आहे. 

कंत्राटदारांकडून नेहमीच्या पद्धतीने करवून घेण्यात येणाऱ्या सार्वजनिक बांधकामांपेक्षा ही स्वच्छतागृहे वेगळी आहेत. ‘स्मार्ट शहरांसाठी स्मार्ट धोरणांसह शाश्वतता’ या तत्त्वानुसार आधुनिक पद्धतीच्या या स्वच्छतागृहांचे वैशिष्ट्ये असून त्यांची रचना आणि बांधणी वास्तुविशारदाने केली आहे. संशोधन आणि विकसनामध्ये मोठ्या बारकाव्याने याची रचना करण्यात आली आहे. नैसर्गिकपणे हवा खेळती राहील अशी व्यवस्था ही या स्वच्छतागृहांत करण्यात आली आहे. या शौचालयामध्ये एक्झॉस्ट फॅन (बाहेर हवा फेकणारे पंखे) वापरलेले नाहीत. यामध्ये दुप्पट हवा खेळती रहावी याची उपाययोजना केली आहे. विशेष म्हणजे या स्वच्छतागृहांच्या ठिकाणी वाय-फाय सुविधाही पुरविण्यात येणार आहे. 

स्वच्छतागृहांच्या आतमध्ये भिंतींना व छतांना रॉकवूल इन्सुलेशन, नाणे टाकल्यावर नॅपकीन देणारी मशीन, ध्वनिफितीद्वारे साह्य, आरसा, मोबाईल चार्जिंगसाठी जागा, स्वयंचलित रुम फ्रेशनर, एफएम रेडिओ, कमी विजेवर चालणारे एलईडी दिवे, स्टेनलेस स्टील बेसिन, बेबी डायपर बदलण्यासाठी जागा, साबण वितरक (सोप डिस्पेन्सर), सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. या स्वच्छतागृहांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. हरित इमारत (ग्रीन बिल्डिंग), नीचांकी कार्बन फूटप्रिंट, पूर्वरचना असलेले (प्री-फॅब्रिकेटेड) बांधकाम, खर्चाचा कार्यक्षमपणे उपयोग, नैसर्गिक हवेची योजना (व्हेंटिलेशन), धातूची भक्कम रचनेमुळे महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित, स्वच्छतेसाठी सुलभ रचना ही याच्या आणखी काही जमेच्या बाजू आहेत. तसेच, आत लॉक इंडिकेटर आणि हूक असून, पृष्ठभाग घसरडा होऊ नये यासाठी २ मिमी जाडीचे व्हिनाईल फ्लोअरिंग वापरण्यात आले आहे. विशेषतः मलनिःसारण व्यवस्थापनासाठी खास सुविधा पुरवण्यात आली आहे. याद्वारे मलमूत्र स्वच्छतागृहातून पीव्हीसी सेप्टिक टाकीत आणि नंतर महापालिकेच्या सांडपाण्यात सोडण्यात येते. 

वैशिष्ट्ये
- संशोधनाअंती वास्तुविशारदांकडून खास रचना
- एक्झॉस्ट फॅनशिवाय हवा खेळती राहते
- दररोज ३-४ वेळा होणार स्वच्छता
- बहिस्थ सीसीटीव्हीने सुरक्षिततेची खबरदारी 
- वाय-फाय सुविधेने युक्त
- एका स्वच्छतागृहाचा खर्च १२ लाख रुपये
- सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वाचे पाऊल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com