भाडे न भरणाऱ्या स्टॉलधारकांना दणका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

शहरात ज्या परवानाधारकांचे पुनर्वसन झाले, त्यांना भाडे आकारण्यात येत आहे. त्यासाठी व्यवसायाच्या स्वरूपानुसार वर्गवारी केली असून, त्या प्रमाणात रोजचे भाडे निश्‍चित केले आहे. त्यातून महापालिकेला २६ कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. या महिनाअखेरपर्यंत दीड कोटी रुपये जमा होतील. जे व्यावसायिक भाडे भरणार नाहीत, त्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत.
- माधव जगताप, अतिक्रमण विभाग प्रमुख

पुणे - महापालिकेचा परवाना असलेल्या स्टॉलधारकांनी दोनऐवजी एका वर्षाचे भाडे भरावे, असा निर्णय झाल्यानंतरही ते भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार आहेत. गेल्या वर्षभराचे भाडे न भरणाऱ्या साडेचारशे स्टॉलधारकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या असून, त्यांच्याकडील स्टॉलचा परवाना काढून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.   

शहरातील सुमारे १६ हजार हातगाडी, फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांना महापालिकेने परवाने दिले आहेत. त्यातील सात हजार स्टॉलधारकांचे फेरीवाला धोरणांतर्गत पुनर्वसन करण्यात आले. मात्र, गेल्या काही वर्षांत रस्त्यांवर बेकायदा हातगाडी, फेरीवाल्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरून पादचारी आणि वाहनचालकांचे अतोनात हाल होत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण शहर अतिक्रमणमुक्त करण्याचे नियोजन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केले आहे. 

फेरीवाला योजनेत पुनर्वसन केलेल्या हातगाडी, फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांना भाडे आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात, महिन्याकाठी किमान साडेसातशे ते नऊ हजार रुपयांचे भाडे निश्‍चित केले आहे. या व्यावसायिकांकडून मागील दोन वर्षांचे भाडे वसूल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

होता. त्याला विरोध झाल्याने एकाच वर्षाचे भाडे घेतले जाईल, असे प्रशासनाने जाहीर केले. त्यानुसार वसुलीही सुरू करण्यात आली आहे. मात्र, व्यावसायिक भाडे भरण्यास टाळटाळ होत असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही एक नवा पैसा भाडे न भरलेल्या साडेचारशे जणांना नोटीस दिली आहे.

Web Title: marathi news pune news stall owner rent municpal