पुरंदरमधील विद्यार्थ्यांनी घेतली मुंबईच्या राजभवनात राज्यपालांची भेट 

Purandar
Purandar

सासवड : गावाकडील शालेय जीवनाच्या, शेतीवाडीच्या, पावसाच्या लहरीपणाच्या, ग्रामीण जीवनाच्या रंगलेल्या गप्पातून विद्यार्थीनी-विद्यार्थ्यांशी हितगूज केले, तेही चक्क राज्यपालांनी. दिवे (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील श्री. कातोबा हायस्कूलचे पाचवी ते दहावीतील तब्बल 130 विद्यार्थी मुंबईत सहलीला गेले होते. त्यावेळी त्यांनी पूर्वपरनावगीने राज्यपाल श्री. सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. शिवाय राज्यपालांचा सकाळचा नाश्ताही विद्यार्थ्यांना खुश करुन गेला.शेतीकामात ही मुलं हातभारही लावतात. याचे राज्यपालांना कौतुक वाटले ! 

मुंबईतील बऱयाच ठिकाणांच्या भेटीच्या या सहलीचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक ए. एन. पाटील, सहाशिक्षक शर्मिला साळुंखे, अनिल कुंभार व सहकाऱयांनी केले होते. मुंबईच्या राजभवनात गेल्यावरच खरे तर हे ग्रामीण विद्यार्थी परिसर पाहून भारावून गेले. विद्यार्थ्यांना राजभवनात जाता येणार व राज्यपालांशी संवाद साधता येणार, याची प्रत्येकालाच उत्सुकता होती. अखेर महामहिम राज्यपाल श्री. सी. विद्यासागर राव यांची भेट झाली. त्यांनी सर्वांचे हसतमुखाने स्वागत केले अन् विद्यार्थ्यांशी हितगुजही केले. 

राज्यपालांनी दिव्याच्या ग्रामीण भागातील शालेय जीवनाची बारकाईने विचारपुस केली. तसेच दिवे (ता. पुरंदर) पट्टयातील शेती व फळबागा याची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनीही आपली प्रसिध्द वाटाणा शेती, अंजीर व सीताफळ बागा, त्यावरील प्रक्रिया उद्योग व परदेशी निर्यातीबाबत त्यांना माहिती दिली. पिकपाणी अन् पाऊसपाण्याचीही माहिती दिली. ही मुले-मुली शिकत असताना पालकांना शेतीकामात मदत करतात, याचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात यश मिळण्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांसाठी राजभवनाच्या हिरवळीवर सकाळच्या नाश्त्याचे आयोजनही यावेळीच्या भेटीत केले होते. गरम सामोसे, जिलेबी, लाडू असा खास बेत होता. 

समुद्राने तिन्ही बाजूने वेढलेला राजभवनाचा रम्य परिसर, तेथील ऐतिहासिक इमारती, सुंदर बगीचे, मयूर विहारातील मोर, जामिनीखालील गुहा, देवीचे मंदिर, राजभवनातील कॉन्फरन्स हॉल, भोजन कक्ष आदी पाहून विद्यार्थी भारावून गेले. राज्यपालांसमवेत ग्रुप फोटोचीही संधी मिळाली. भेटीत राज्यपालांना विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेली भेटकार्ड, चित्रे दिली. या शैक्षणिक सहलीत याशिवाय गगनगिरी आश्रम, वरदविनायक, हाजीआली, नेहरू तारांगण, घारापुरी लेणी, हँगिंग गार्डनलाही भेट दिली. यावेळी म्हाडाचे माजी उपाध्यक्ष व दिव्याचे सूपूत्र संभाजीराव झेंडे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या सहलीसाठी माजी विद्यार्थी व पोलीस निरीक्षक गोकुळ राऊत, पंढरीनाथ झेंडे यांचे विशेष सहकार्य मिळाले, असे सहशिक्षीका शर्मिला साळुंखे यांनी 'सकाळ'ला सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com