'तंबाखूजन्य पदार्थ मिळणाऱ्या दुकानांत जाणेच आम्ही टाळतो'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

पुणे - तंबाखू, सिगारेटचे आधीच्या पिढीवर झालेले दुष्परिणाम आम्ही बघतो आहोत. ते सर्व भयंकर आहे. त्यामुळे भविष्यातील पिढीचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थ आणि खाद्यपदार्थांच्या एकत्रित विक्रीवर बंदी आणणे काळाची गरज आहे, असे मत शहरातील तरुणांनी व्यक्त केले. समर्थ मल्लिनाथ म्हणाला, 'तंबाखूजन्य पदार्थ मिळणाऱ्या दुकानांत जाणे टाळतो आणि जायचेच असेल तर सिगारेट ओढणारे काका तेथून जाण्याची वाट पाहतो आणि मगच जातो.''

चॉकलेट, गोळ्या, चिप्स, बिस्किटे असे अन्नपदार्थ आणि तंबाखूजन्य पदार्थ एकाच दुकानातून विक्री करण्यास बंदी घालणारा आदेश राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर शाळकरी विद्यार्थ्यांची याबाबत नेमकी मते काय आहेत, याची माहिती "सकाळ'ने घेतली, त्या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी हा सूर काढला.

कोणाच्या घरातील व्यक्तीला तंबाखूमुळे दुर्धर आजार झाला आहे, तर कोणीतरी याबाबत ऐकले आहे. त्यामुळे तंबाखू, सिगारेटबद्दल नव्या पिढीत धास्ती निर्माण झाल्याचे निरीक्षण आहे. मानवी आरोग्याला अपायकारक असलेल्या या पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणली पाहिजे, असे मुला-मुलींनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

विद्यार्थी म्हणतात...
हर्ष जाधव म्हणाला, 'तंबाखू खाणाऱ्यांचा मला खूप राग येतो. त्या सिगारेटच्या धुराचा त्रास होतो. त्यामुळे तंबाखू खाणारे किंवा सिगारेट ओढणारे काका त्या टपरीत असतील तर दुकानात जाणे टाळतो.''

प्रणिता म्हणाली, 'मला तंबाखू खाणारे खूप घाण वाटतात. त्यांच्यासमोर त्याच दुकानात जायला नको वाटते.''

प्रतीक भावे म्हणाला, 'तंबाखू खाऊन थुंकतात किंवा सिगारेटचा धूर सोडतात त्या दुकानात न जाता मी लांबच्या दुकानात जाणे पसंत करतो.''

Web Title: marathi news pune news tobacco shop student