वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘रोडमॅप’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

पुणे - मार्केट यार्ड येथील किराणा भुसार आणि भाजीपाला बाजारात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी संबंधित घटकांशी चर्चा करून ‘रोडमॅप’ केला जाईल, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त सचिव बी. जे. देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

पुणे - मार्केट यार्ड येथील किराणा भुसार आणि भाजीपाला बाजारात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी संबंधित घटकांशी चर्चा करून ‘रोडमॅप’ केला जाईल, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त सचिव बी. जे. देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

पुणे बाजार समितीमध्ये कामाचा जास्त अनुभव असलेल्या देशमुख यांनी सचिवपदाची सूत्रे हाती घेतली आहे. बाजार आवारातील विविध प्रश्‍नांसंदर्भात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यापूर्वी बाजार समितीचे सचिव म्हणून काम पाहताना २००५ मध्ये वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केलेल्या उपायांचा फायदा झाला होता, असे नमूद करीत देशमुख म्हणाले, ‘‘आता परिस्थिती बदलली आहे.

बाजारात येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. बाजार आवारात शेतीमाल घेऊन येणारे शेतकरी, व्यापारी, अडतदार, टेंपोचालक, माल वाहतूकदार अशा सर्व घटकांशी चर्चा करून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी आवश्‍यक ते सर्व उपाय करून वाहतूक नियोजन केले जाईल.’’
बाजारातील अनधिकृत टपऱ्या आणि स्टॉलमुळे वाहतूक कोंडीत भर पडते.

विद्यमान प्रशासकीय मंडळाच्या आशीर्वादामुळे काही अतिक्रमणे झाली आहेत का, याकडे लक्ष वेधले असता, देशमुख यांनी सावध पवित्रा घेतला. ‘‘अतिक्रमण आणि बाजाराची गरज लक्षात घेतली जाईल. या टपऱ्या आणि स्टॉलचा फेरविचार केला जाईल,’’ असे त्यांनी सांगितले. बाजाराच्या प्रवेशद्वारावर मालवाहतूकदार, टेंपोचालकांकडून अनधिकृत शुल्क वसुलीचा प्रकार होत असल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, असा प्रकार सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

देशमुख यांचा दरारा
बाजार समितीच्या कारभारात यापूर्वी स्वत:चे स्थान निर्माण केलेल्या बी. जे. देशमुख यांनी रविवारी पहाटेच बाजारात हजेरी लावली. बाजारातील नियोजनाची माहिती घेतली. या वेळी रविवारी साप्ताहिक सुटी असलेले अधिकारी हजर होते. सुरक्षा कर्मचारी वाहतूक नियोजन करताना आढळून आले. एकूणच समितीच्या प्रशासकीय कामात त्यांचा असलेला दरारा दिसून येत होता.

Web Title: marathi news pune news traffic roadmap