तृतीयपंथीयाला मॉलमध्ये जाण्यापासून रोखले; सोशल मिडीयावरून अन्याय समोर

शनिवार, 17 मार्च 2018

पुण्यातील फिनिक्स मार्केट सिटीमध्ये प्रवेश करणाऱ्या सोनाली या तृतीयपंथी नागरिकाला सुरक्षा रक्षकांनी दरवाजावर अडविले. कारण होते, फक्त ती तृतीयपंथी आहे. मला आत जाऊ द्या, मी येथे कार्यक्रमाला येत असते असे सोनालीने सतत सुरक्षा रक्षकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

पुणे : समाजात सतत सापत्न वागणुकीला सामोरे जावे लागत असलेल्या तृतीयपंथी नागरिकांना आता सार्वजनिक ठिकाणी जाण्यापासूनही रोखण्यात येत असल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील फिनिक्स मार्केट सिटीमध्ये खरेदीसाठी जाणाऱ्या एका तृतीयपंथी नागरिकाला प्रवेश करताना रोखल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावरून व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे तृतीयपंथीयांवर होत असलेल्या अन्यायाची एक घटना समोर आली आहे.

पुण्यातील फिनिक्स मार्केट सिटीमध्ये प्रवेश करणाऱ्या सोनाली या तृतीयपंथी नागरिकाला सुरक्षा रक्षकांनी दरवाजावर अडविले. कारण होते, फक्त ती तृतीयपंथी आहे. मला आत जाऊ द्या, मी येथे कार्यक्रमाला येत असते असे सोनालीने सतत सुरक्षा रक्षकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचे काही न ऐकता तिला प्रवेश देण्यात आला नाही. मात्र, यापूर्वी पैसे दिल्यानंतर तिला मॉलमध्ये जाऊ देण्यात आले होते. आता पैसे न देत असल्यामुळे मॉलमध्ये जाऊ देण्यात येत नाही, असा आरोप तिने केला. सोनालीबरोबर असलेल्या अन्य काही जणांनी याचा व्हिडिओ चित्रीत केला आणि सोशल मिडीयावर प्रसिद्ध करत तृतीयपंथी नागरिकांना सहन करावा लागत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली.

सोशल मिडीयावर हा व्हिडिओ प्रसिद्ध होताच अन्य तृतीयपंथी नागरिकांकडून तिला पाठिंबा देण्यात आला. श्याम कोन्नूर याने आपल्या फेसबुक अकाउंटवरून हा व्हिडिओ प्रसिद्ध करत सोनालीला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. तसेच त्याने तृतीयपंथी नागरिकांना मॉल. रेस्टॉरंट, चित्रपटगृहांमध्ये जाण्याची परवानगी नाही का? असा प्रश्न उपस्थित केला. सोनालीच्या हक्कांसाठी आम्ही लढत राहू, असेही त्याने म्हटले आहे. या प्रकरणावरून आपला समाज तृतीयपंथी नागरिकांबाबत अद्याप किती मागास आहे, हे स्पष्ट होते.

Web Title: Marathi news Pune news transgender stopped entering a mall in Pune