अल्ट्राटेक सिमेंट कंपनीविरूद्ध बेमुदत उपोषण

जनार्दन दांडगे
शुक्रवार, 2 मार्च 2018

उरुळी कांचन (पुणे) : पेठ (ता. हवेली) येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमुळे प्रदूषण होत असताना त्या विरोधात आवाज उठावणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ पेठ ग्रामस्थांनी कंपनी पूर्णपणे बंद व्हावी या मागणीसाठी कंपनीच्या प्रवेशद्वारावर गुरुवार (ता. १) पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

उरुळी कांचन (पुणे) : पेठ (ता. हवेली) येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमुळे प्रदूषण होत असताना त्या विरोधात आवाज उठावणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ पेठ ग्रामस्थांनी कंपनी पूर्णपणे बंद व्हावी या मागणीसाठी कंपनीच्या प्रवेशद्वारावर गुरुवार (ता. १) पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

एखाद्या प्रकल्पाची उभारणी करताना त्या प्रकल्पामुळे स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असेल तर अशा प्रकल्पांना कायदेशीर परवानगी मिळत नाही. मात्र जिल्हा प्रशासनाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांना हाताशी धरून कंपनीने जिल्हा प्रशासनाकडून कंपनीच्या उभारणीची परवानगी घेतली होती असा आरोप उपोषणकर्त्यांनी यावेळी केला. सन २०१४ साली कंपनीने अकृषिक परवान्यातील (एनए) नियम व अटींचा भंग केला असल्याचा अहवाल तत्कालीन हवेली उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला होता. यावर कोणतीही कारवाई झाली नाही तसेच ग्रामस्थांच्या वतीने कंपनीच्या विरोधात न्यायालयामध्ये खटला दाखल केला असून, कायदेशीर प्रक्रियेत प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळत नसल्याने या खटल्याचे काम अद्याप अपूर्ण आहे.

बेकायदेशीरित्या सुरु असलेल्या या कंपनीचे उत्पादन बंद करावे. तसेच कंपनी प्रशासनाच्या दबावाने पोलिस प्रशासनाने कंपनी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांची चौकशी व्हावी व यामध्ये दोषी आढळणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशा मागणीसाठी हे उपोषण करत असल्याचे उपोषणकर्ते सुजित चौधरी यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत तुळशीराम उत्तम चौधरी, गणेश बाळू चौधरी, सुजित भाऊ हाके, सोमनाथ बबन चौधरी, कांतिलाल साहेबराव गायकवाड, गणेश एकनाथ चौधरी, अभिषेक तुकाराम चौधरी यांनी देखील उपोषणात सहभाग घेतला आहे.

दरम्यान, उपोषणास दोन दिवस उलटूनही कुठल्याच शासकीय अधिकाऱ्यांनी उपोषणाची दखल घेतली नाही, तथापि पोलिस ठाण्यामध्ये उपोषणाचे निवेदन देवूनही ऐनवेळी पोलिस अधिकाऱ्यांनी उपोषणकार्त्यांवर दबाव टाकून सुरुवातीलाच उपोषण मोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप यावेळी सुजित चौधरी यांनी केला.

Web Title: Marathi news pune news ultra tech cement company hunger strike