विरोधकांपेक्षा जास्त निधी साडेतीन वर्षांत आणला : आमदार भरणे

राजकुमार  थोरात
रविवार, 11 मार्च 2018

गेल्या साडेतीन वर्षांमध्ये तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीजास्त निधी आण्याचे काम सुरु आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये  ५६ कोटी रुपयांच्या रस्त्यासाठी भरीव निधी आणला आहे. 

- दत्तात्रेय भरणे, आमदार

वालचंदनगर : विरोधकांना १९ वर्षांमध्ये तालुक्यासाठी जेवढा निधी आणता आला नाही, त्यापेक्षा जास्त निधी साडेतीन वर्षांमध्ये आणला असून, कोण निष्क्रिय व सक्रिय हे जनतेला कळाले अाहे. आगामी काळामध्ये जनतेने निष्क्रिय व्यक्तीला थारा न देऊ नये, असे आवाहन अामदार दत्तात्रेय भरणे यांनी केले. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.   

कुरवली (ता.इंदापूर) येथे विकासकामांच्या भूमिपूजन व उद्धघाटनाच्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमामध्ये भरणे बोलत होते. यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, संचालक दत्तात्रेय सपकळ, भाऊसाहेब सपकळ, सरपंच शोभा बापूराव पांढरे, उपसरपंच रवींद्र कदम उपस्थित होते.

यावेळी भरणे यांनी सांगितले, की तालुक्यातील विरोधक निवडणूका जवळ आल्यानंतर जातीपातीचे खोटे राजकारण करुन केवळ लोकांना भूलविण्याचे काम करीत आहेत. विरोधक तालुक्याचा विकास करण्यामध्ये अपयशी झाले आहेत. गेल्या साडेतीन वर्षांमध्ये तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीजास्त निधी आण्याचे काम सुरु आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये  ५६ कोटी रुपयांच्या रस्त्यासाठी भरीव निधी आणला आहे. 

विरोधकांना १९ वर्षांमध्ये एवढा निधी कधी आणता आला होता का ? समाजामध्ये काम करीत असताना 'व्हाईट कॉलर'पेक्षा सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लावली जात असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती माने यांनी सांगितले. की जिल्हा परिषदेचे  माध्यमातून तालुक्यासाठी जास्तीजास्त निधी अाणून तालुक्याचा विकास केला जाईल. कुरवली ते चव्हावस्तीसाठी ६० लाख रुपये खर्च करून होणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन व कासलिंग मंदिराच्या सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले. 

Web Title: Marathi News Pune News Walchandnagar News Funding Opposition says MLA Dattatrey Bharane