पुणे - लोणी काळभोरमध्ये महिला दिनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

जनार्दन दांडगे
गुरुवार, 8 मार्च 2018

लोणी काळभोर (पुणे) : "महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जातात. ग्रामीण भागातील महिला देखील काळानुसार बदलत आहेत. मात्र महिला सक्षमीकरण होत असताना महिलांनी आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही याची देखील काळजी घेणे जरुरीचे आहे, असे मत जिल्हा परिषद सदस्या अर्चना कामठे यांनी व्यक्त केले.

लोणी काळभोर (पुणे) : "महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जातात. ग्रामीण भागातील महिला देखील काळानुसार बदलत आहेत. मात्र महिला सक्षमीकरण होत असताना महिलांनी आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही याची देखील काळजी घेणे जरुरीचे आहे, असे मत जिल्हा परिषद सदस्या अर्चना कामठे यांनी व्यक्त केले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पूर्व हवेलीमध्ये महिलांसाठी विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांसाठी विविध योजना व गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्चना कामठे होत्या. यावेळी बोलताना त्यांनी वरील मत मांडले. यावेळी जेष्ठ व आपंगांना आरोग्य साहित्य पुरविणे, युवती, मागास वर्गीय महिला व अपंगांना रोजगाराचे साहित्य किंवा गृहपयोगी वस्तू पुरविणे, एक किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या मातांना ५ ते १० हजार रुपयांचे बचत प्रमाणपत्र वाटप व येथील विश्वराज हॉस्पिटलच्या वतीने जेष्ठ नागरिकांना विश्वराज आरोग्य हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले. 

यावेळी 'यशवंत'च्या माजी संचालिका मीना काळभोर, पंचायत समिती सदस्या रोहिणी राऊत, सरपंच गौरी गायकवाड, उपसरपंच बाळासाहेब कदम, भारतीय जनता पक्षाच्या महिला जिल्हा सरचिटणीस पूनम चौधरी, विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. आदिती कराड, ग्रामपंचायत सदस्या वैजंता कदम, राजश्री काळभोर, मंदाकिनी नामुगडे, वंदना काळभोर, राणी बडदे, अमृता कदम, रुपाली कोरे, माधुरी काळभोर, पोलिस पाटील प्रियांका भिसे, डॉ. अंजली काळभोर उपस्थित होत्या. यावेळी कदमवाकवस्ती येथील महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्य पदार्थांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. तसेच विश्वराज हॉस्पिटलच्या वतीने महिलांच्या सांधेदुखी, हृदयरोग अशा आजारांची तपासणी करण्यात आली. 

लोणी काळभोर (ता. हवेली) येथे महिलांसाठी रांगोळी स्पर्धा व महिलासाठी 'होम मिनिस्टर; हा करमणुकीचा कार्यक्रम झाला. दरम्यान पुणे येथील डॉ. संजय अग्रवाल यांच्या वतीने महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सुरेखा चौरे, आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे, माजी पंचायत समिती सदस्या रत्नमाला भोसले, सरपंच वंदना काळभोर, माजी सरपंच ललिता काळभोर, ग्रामपंचायत सदस्या व महिला उपस्थित होत्या.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने थेऊर (ता. हवेली) येथील तारमळा जिल्हा परिषद शाळेमध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. दरम्यान शाळेतील मुलांनी सांकृतिक कार्यक्रम व रांगोळी स्पर्धेत भाग घेतला. तसेच महिला व मुलींना जगभरातील कर्तबगार महिलांची ओळख व्हावी या उद्देशाने 'दामिनी' नावाने तयार केलेला स्लाईड शो दाखवण्यात आला.
 

Web Title: Marathi news pune news womens day celebration