बिघडले जैविक घड्याळ, ऐंशीवर आजारांना आमंत्रण!

बिघडले जैविक घड्याळ, ऐंशीवर आजारांना आमंत्रण!

पुणे - बदललेली जीवनशैली, आहार पद्धतीतील बिघाड आणि ताणतणाव यांमुळे झोपेच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. धकाधकीच्या जीवनामध्ये शरीरातील "जैविक घड्याळ' बिघडल्यामुळे नैसर्गिक झोपेमध्ये अनियमितता आली आहे. त्यामुळे जवळपास ऐंशीहून जास्त आजार बळावत आहेत. शांत झोपेचा उत्सव साजरा करण्यासाठी "जागतिक शांत झोप दिन' उद्या (16 मार्च) साजरा होत आहे.

त्यानिमित्ताने तज्ञांशी चर्चा केली असता हे वास्तव समोर आले.
औषधांशिवाय झोपेच्या समस्येचे निराकरण आणि व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी मार्च महिन्यातील तिसऱ्या शुक्रवारी हा दिवस जगभरात साजरा होतो. या संदर्भात काम करणाऱ्या "इंडियन असोसिएशन फॉर स्लीप अप्निया'च्या (आयएएसएसए) सदस्या डॉ. कविता संदीप चौधरी म्हणाल्या, 'कामाच्या बदललेल्या वेळा, दैनंदिन कामांमुळे होणारे शारीरिक कष्ट आणि मानसिक ताणतणाव यांमुळे नैसर्गिक झोपेच्या वेळांमध्ये बदल झाले आहेत. त्यामुळे मेंदूद्वारे नियंत्रित केल्या जाणाऱ्या "जैविक घड्याळा'मध्ये (बायोलॉजीकल क्‍लॉक) बदल होत आहेत. परिणामी, झोपेमध्ये अनियमितता आणि त्याचा परिणाम विविध आजार बळावतात. 80 टक्के जणांना झोपेत घोरण्याचा त्रास होतो. तसेच झोप न लागणे, स्मृतिभ्रंश, झोपेतून उठताना थकवा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असे आजार होतात.

विशेषतः रात्रीच्या वेळी काम करणाऱ्या वाहनचालक, आयटी कंपन्यांमधील कर्मचारी यांना हा त्रास होतो. त्यामुळे कामाच्या वेळी अपघात होतात. त्यावर उपाय म्हणून वैद्यकीय उपचारांसोबत योग, प्राणायाम, वेळेत झोपणे, रात्री उशिरापर्यंत मोबाईल, टीव्ही पाहणे टाळले तर ही समस्या कमी होऊ शकते.''

योगासनांच्या उपयुक्ततेबाबत योग प्रशिक्षक डॉ. पल्लवी कव्हाणे म्हणाल्या, ""योगशास्त्रामध्ये निद्रानाशावर मात करण्यासाठी विविध आसने सांगितलेली आहेत. संतुलित आहारासह दैनंदिन मण्डुकासन, योगमुद्रा, वज्रासन, गोमुखासन, पवनमुक्तासन आणि शवासन केल्यास झोपेची समस्या दूर होऊ शकते. या आसनांसोबत अनुलोम, विलोम, भ्रामरी आणि उज्जायी प्राणायाम करावा.''

शांत झोपेसाठी
- जैविक घड्याळानुसार आचरण
- किमान सहा ते सात तास झोपणे
- रात्री उशिरापर्यंत मोबाईल, संगणक, टीव्ही पाहणे टाळणे
- सतत मन शांत आणि प्रसन्न ठेवणे
- मसालेदार, तेलकट पदार्थ आहारात टाळणे
- संगीत ऐकणे, वाचन करणे

...अन्यथा गाठतील हे आजार
निद्रानाश, झोपेत फिट येणे, झोपेत चालणे, झोपेत काही सेकंद श्‍वास थांबणे, घोरण्याचा त्रास, विसरभोळेपणा, दिवसा व झोपेतून उठताना थकवा, निरुत्साह जाणवणे, उच्च रक्तदाब, मधुमेह, लैंगिक आणि मानसिक आजार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com