रखडलेल्या नाट्यगृहासाठी कलाकारांचा जागरण गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

पुणे : अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेच्या वतीने निधीअभावी रखडलेल्या कोथरूडमधील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलामंदिरचे अर्धवट काम पूर्ण करावे, या मागणीसाठी नाट्य कलाकारांनी जागरण गोंधळ घालत आंदोलन केले. 

पुणे : अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेच्या वतीने निधीअभावी रखडलेल्या कोथरूडमधील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलामंदिरचे अर्धवट काम पूर्ण करावे, या मागणीसाठी नाट्य कलाकारांनी जागरण गोंधळ घालत आंदोलन केले. 

पुणे महापालिकेच्या वतीने कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ होत असलेल्या नवीन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलामंदिर या नाट्यगृहाचे काम गेल्या तीन वर्षांपासून रेंगाळले आहे. यंदाच्या वर्षीही दहा कोटी रुपयांची आवश्‍यकता असताना तीन कोटी रुपयांचीच तरतूद पालिकेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे हे काम या वर्षात पूर्ण होण्याची शक्‍यता नाही. याचा निषेध करीत अखिल भारतीय नाट्य परिषद कोथरूड शाखेच्या वतीने अध्यक्ष सुनील महाजन यांच्या नेतृत्वाखाली जागरण गोंधळ घालत आंदोलन करण्यात आले. 

या वेळी नाट्यपरिषदेचे सत्यजित धांडेकर, समीर हंपी, नितीन पवार, वंदन नगरकर, निकिता मोघे, मंजुश्री ओक, संजय बेंद्रे, श्रीराम रानडे आदी उपस्थित होते. या वेळी सर्व नाट्यकलावंतांनी जागरण गोंधळ घालत पालिका प्रशासनाचा निषेध केला. 

सुनील महाजन म्हणाले, ''शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलामंदिर या नाट्यगृहाचे काम गेल्या तीन वर्षांपासून रेंगाळले आहे. यासाठी पालिका अपुरा निधी देत आहे. 'बालगंधर्व'साठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. सुरवातीला अपूर्ण काम पूर्ण करण्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. या मागणीचे पत्र आम्ही महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेते यांना दिले आहे. अर्धवट अवस्थेतील नाट्यगृहाचे काम तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी आवश्‍यक निधीची तरतूद करण्यात यावी. या मागणीची दहा दिवसांत दखल न घेतल्यास नाट्य परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

Web Title: marathi news pune news yashwantrao chavan theatre pune