वृत्तपत्र विक्रेत्या महिलांचा ‘सकाळ’तर्फे सत्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

पुणे - ऊन, पाऊस, थंडी या कशाचीही पर्वा न बाळगता महिला वृत्तपत्र विक्रेत्या दिनक्रम सुरू ठेवतात. कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी संसाराचा गाडा सांभाळून वृत्तपत्र व्यवसाय करतात, अशा या कर्तृत्ववान महिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘सकाळ’तर्फे महिला वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार आणि कृतज्ञता समारंभ आयोजित करण्यात आला होता. 

पुणे - ऊन, पाऊस, थंडी या कशाचीही पर्वा न बाळगता महिला वृत्तपत्र विक्रेत्या दिनक्रम सुरू ठेवतात. कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी संसाराचा गाडा सांभाळून वृत्तपत्र व्यवसाय करतात, अशा या कर्तृत्ववान महिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘सकाळ’तर्फे महिला वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार आणि कृतज्ञता समारंभ आयोजित करण्यात आला होता. 

‘सकाळ’च्या बुधवार पेठ कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात महिलांना ‘शारदाबाई गोविंदराव पवार’ ही पुस्तिका आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या वेळी ‘साप्ताहिक सकाळ’च्या सहसंपादक ऋता बावडेकर, तनिष्का मासिकाच्या सहसंपादक मंजिरी फडणीस, ‘सकाळ’ पुणे जिल्हा आवृत्तीच्या मुख्य उपसंपादक नयना निर्गुण, वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे, वरिष्ठ उपाध्यक्ष दत्ता पिसे, सचिव अरुण निवंगुणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

बावडेकर म्हणाल्या, ‘‘महिला दिनाच्या निमित्ताने गेल्या तीन वर्षांपासून सकाळ समूहातर्फे महिला वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात येतो. पूर्वी या क्षेत्रात फक्त पुरुषच काम करत होते. मात्र आता महिला पुरुषांच्या सोबतीने काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. महिलांना मिळालेल्या या यशात पुरुषांचाही तेवढाच सहभाग आहे.’’ 

‘‘संसार तुमच्या हाती सोपवून आम्ही कमविण्यासाठी बाहेर पडतो. तुम्ही पाठीशी खंबीरपणे उभे आहात म्हणून सर्व संकटांशी लढण्याची ताकद आम्हाला मिळते,’’ अशी भावना विजय पारगे यांनी व्यक्त केली.  

महिलांना लढण्यासाठी बळ मिळावे, यासाठी ‘सकाळ’ने दिलेली ‘शारदाबाई गोविंदराव पवार’ ही पुस्तिका कायम स्मरणात राहील. समाज घडविण्यासाठी हे पुस्तक उत्तम आहे. तसेच महिला वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार-कृतज्ञता समारंभ आयोजित केल्याबद्दल ‘सकाळ’चे मनापासून आभार. 
- अंजली पासलकर, वृत्तपत्र विक्रेत्या

आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. अशा महिलांसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी बचत गटाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांची ऋणी आहे. ‘सकाळ’तर्फे नेहमीच महिलांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात यासाठी त्यांचेही मनापासून आभार.
- विनया संबेटला, वृत्तपत्र विक्रेत्या

Web Title: marathi news pune Newspaper vendors women pune sakal