पुणेकरांच्या मते विकासकामांचा वेग ‘सर्वसाधारण’

पुणेकरांच्या मते विकासकामांचा वेग ‘सर्वसाधारण’

महापालिकेच्या सत्तांतरास एक वर्ष झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने केलेल्या सर्वेक्षणात ४१ टक्के नागरिकांनी सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे; तर २३ टक्के नागरिकांनी भाजपला आणखी वेळ द्यायला हवा, असे मत नोंदवले. पण, त्याच वेळी विकासकामांच्या आघाडीवर ‘सर्वसाधारण’ कामगिरी असल्याचे ४६ टक्के नागरिकांचे मत आहे. महापौर मुक्ता टिळक, प्रभागातील स्थानिक नगरसेवकांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करीत पुणेकरांनी पालिकेचे निर्णय विकासपूरक असल्याचे मत नोंदविले आहे. विरोधी पक्ष म्हणून सर्वांत प्रभावी कामगिरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्यांच्या नगरसेवकांनी केल्याचे मतदारांना वाटते. 

महापौर मुक्ता टिळक यांच्या कामगिरीवर ‘उत्तम’ अशी मोहोर उठविणाऱ्या नागरिकांचे प्रमाण २२ टक्के आहे, तर ‘बरी’ आहे, असे म्हणणाऱ्यांचे प्रमाण ४६ टक्के आहे. प्रभागातील नगरसेवकांच्या कामगिरीबद्दल ३० टक्के नागरिकांनी ‘उत्तम’ म्हटले आहे, तर ४४ टक्‍क्‍यांनी कामगिरी ‘बरी’ असल्याचे नमूद केले आहे. चांगला विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला ३८ टक्‍के नागरिकांनी पसंती दिली असून, काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी २१ टक्के नागरिकांनी मत दिले आहे. विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांची कामगिरी उत्तम असल्याचे ९ टक्‍के नागरिकांनी म्हटले आहे, तर ३६ टक्के नागरिकांनी ‘बरी’ असल्याचे सांगितले आहे. 

वर्षभरात आजूबाजूला किती विकासकामे होत आहेत, या प्रश्‍नाला २० टक्के नागरिकांनी ‘भरपूर’, तर तब्बल ४६ टक्के नागरिकांनी ‘साधारण’ असे उत्तर दिले.

महिलांच्या नजरेतून 
सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ३६ टक्के महिला आहेत. भाजपच्या कामगिरीवर समाधानी असलेल्या महिलांचे प्रमाण ३९ टक्के आहे, तर २३ टक्के महिलांनी पक्षाला आणखी वेळ दिला पाहिजे, असे मत नोंदविले आहे. प्रभागातील नगरसेवकांची कामगिरी उत्तम असल्याचे २५ टक्के महिलांनी म्हटले आहे. तर, कामगिरी बरी असल्याचे ४५ टक्के महिलांचे मत आहे. विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वाधिक म्हणजे ३५ टक्के आणि काँग्रेसची २४ टक्के महिलांनी कामगिरी चांगली असल्याचे म्हटले आहे. महापालिका नागरिकांच्या हिताचे आणि विकासपूरक निर्णय घेत आहे का, या प्रश्‍नावर तब्बल ३५ टक्के महिलांनी ‘होय’ असे म्हटले आहे, तर सांगता येत नाही, असे मत ३० टक्के महिलांनी नोंदविले आहे. 

उच्चशिक्षित नागरिकांच्या नजरेतून 
सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ४८ टक्के पदवी आणि पदव्युत्तर पदवीधारक आहेत. त्यापैकी ५० टक्के नागरिक भाजपच्या कामगिरीवर ‘समाधानी’ आहेत, तर २५ टक्के नागरिकांनी आणखी वेळ द्यायला हवा, असे मत नोंदविले आहे. प्रभागातील नगरसेवकांची कामगिरी ‘उत्तम’ असल्याचे मत ३२ टक्के, तर ‘बरी’ असल्याचे ४३ टक्के नागरिकांनी नोंदविले आहे. महापालिका नागरिकांच्या हिताचे आणि विकासपूरक निर्णय घेत आहे, असे ४० टक्के नागरिकांना वाटते; तर २४ टक्के नागरिकांनी ‘दिशाहीन’ असल्याचे मत व्यक्त केले आहे.

३६ टक्‍के नागरिकांच्या मते कामे विकासपूरक 
शहरातील गृहिणी, विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांनी नोंदविलेल्या मतांचे स्वतंत्रपणे विश्‍लेषण केल्यानंतर असे लक्षात येते, की सत्ताधारी भाजपच्या कामगिरीवर या घटकातील ३७ टक्के नागरिक समाधानी आहेत. सत्ताधाऱ्यांना आणखी वेळ द्यायला हवा आणि असमाधानी असल्याचे मत प्रत्येकी २५ टक्के नागरिकांनी व्यक्त केले आहे. महापालिका नागरिकांच्या हिताचे आणि विकासपूरक निर्णय घेत असल्याची भावना या घटकातील ३६ टक्के नागरिकांनी व्यक्त केली आहे, तर २४ टक्के नागरिकांनी निर्णय दिशाहीन असल्याचे म्हटले आहे. 

प्रभागातील नगरसेवकांच्या कामगिरीबद्दलही या घटकातील २७ टक्के नागरिकांनी ‘उत्तम’, ४३ टक्के नागरिकांनी ‘बरी’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तुपे यांची कामगिरी उत्तम असल्याचे मत ७ टक्के, तर ‘बरी’ असल्याचे मत ३० टक्के नागरिकांनी व्यक्त केले आहे. असे असले तरी प्रभावी विरोधी पक्ष म्हणून ३६ टक्के नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि त्यापाठोपाठ २४ टक्के नागरिकांनी काँग्रेस पक्षाचे नाव घेतले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आदी पक्षांनी रचनात्मक विरोधक म्हणून ‘बरी’ कामगिरी केल्याचे ४५ टक्के नागरिकांनी म्हटले आहे. 

शहरामध्ये एका वर्षाच्या काळात आजूबाजूला विकासाची कामे होत आहेत, याची जाणीव ‘भरपूर’ होत असल्याचे मत १४ टक्के नागरिकांनी, ‘साधारण’ असल्याचे ३९ टक्‍क्‍यांनी, तर ‘अल्प’ असे मत २५ टक्के नागरिकांनी व्यक्त केले आहे.

    असे झाले सर्वेक्षण 
‘टीम सकाळ’ आणि मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागातर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रभागामध्ये फिरून माहिती गोळा केली. सर्वेक्षणामध्ये नागरिकांकडून दहा प्रश्‍नांचा समावेश असलेला अर्ज प्रत्यक्षात भेटून भरण्यात आला. यात प्रत्येक प्रभागातील स्त्री-पुरुष, तरुण-ज्येष्ठ नागरिक, शिक्षित-अशिक्षित, नोकरदार-व्यावसायिक या व अशा सर्व घटकांचा समावेश करण्यात आला आहे. पक्षाची कामगिरी, महापौरांची कामगिरी, विरोधी पक्षांचे काम, प्रशासनातील अधिकाऱ्यांविषयीची प्रतिक्रिया, प्रभागातील नगरसेवकाचे काम, विकासकामांविषयीची जाणीव अशा विविध प्रश्‍नांची उत्तरे नागरिकांकडून नोंदविण्यात आली. तंत्रज्ञानाच्या आधारे सरासरी; तसेच प्रत्येक घटकाने नोंदविलेल्या माहितीचे विश्‍लेषण सविस्तरपणे करण्यात आले आहे.

   मावशी आणि ऑन्टी 
सर्वेक्षणात सहभागी झालेले हे विद्यार्थी झोपडपट्टीतील स्त्रियांना अक्का, मावशी, काकू अशी हाक मारत आणि त्या स्त्रियाही त्यांना नीट माहिती देत होत्या. सदाशिव, नारायण, शनिवार या पेठांतून, तसेच कर्वेनगर, सहकारनगर येथील सुशिक्षित नागरिकांच्या वस्त्यांमधून ‘मावशी, काकी’ अशी हाक देताच प्रतिसादच मिळत नव्हता. सदाशिव पेठेत एका विद्यार्थ्याला थेट विचारण्यातच आले, ‘‘तुला काय मी मावशी वाटतेय?’’ मग या विद्यार्थ्यांनी ‘मॅडम, ऑन्टी’ अशी हाक मारणे सुरू केले व त्यांना माहितीही मिळू लागली.

सदाशिवपेठी अनुभव 
वडारवाडी, धायरी, वारजे, खराडी आणि भवानी पेठ येथे पाहणी करायला गेलेल्या विद्यार्थ्यांना काही घरातून चहाही मिळाला; तर दत्तवाडीतील एका सोसायटीत विद्यार्थिनी काही बोलण्याआधीच दरवाजाच्या आतूनच ‘एका पैशाचीही मदत मिळणार नाही’, असे बजावण्यात आले, तर सदाशिव पेठेत दुपारी ३.५५ वाजता दार ठोठावणाऱ्या एका विद्यार्थिनीला दारावरचा फलक वाचायला सांगून दार बंद करण्यात आले. फलक होता - ‘दुपारी दोन ते चार या वेळेत दार वाजवू नये.’

महापौरांचे नाव माहीत नाही 
महापौर मुक्ता टिळक यांचे नाव माहीत नसलेल्यांमध्ये महिलांची संख्या जास्त होती. त्यातही हे नाव माहीत नसणाऱ्यांत झोपडपट्टीपेक्षा सोसायट्यांमधील महिलांचे प्रमाण अधिक होते. आपल्या प्रभागातील नगरसेवकांचे नाव माहीत नसणाऱ्यांतही सोसायट्यांमधीलच महिला अधिक होत्या.

    लोकशाहीचे असेही दर्शन 
- बहुतेक सोसायट्यांमधे पाहणी करण्यासाठी प्रवेशद्वारावरच मनाई करण्यात येत होती. काही सोसायट्यांमध्ये ‘अध्यक्ष व सेक्रेटरी हेच सगळ्यांच्या वतीने प्रश्‍नांची उत्तरे देतील’, असे सांगून ‘लोकशाही’चे दर्शन घडवण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com