निर्णयाची वेळेत करा अंमलबजावणी 

निर्णयाची वेळेत करा अंमलबजावणी 

सत्ताबदलानंतर पुण्यात अनेक सकारात्मक बदल दिसून येत आहेत. मेट्रोचे काम जोरात सुरू आहे. अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प मार्गी लागलेले दिसतात. हे प्रकल्प येत्या चार वर्षांत वेळेत पूर्ण व्हावेत, अशी आमची अपेक्षा आहे. नागरिकांच्या सुरक्षेबाबतही पोलिस आजकाल तक्रारीची वाट न बघता स्वतः कारवाई करताना दिसतात.
- नेहा जोशी, उद्योजक

शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. अपुऱ्या रस्त्यांवर हातगाड्या, टपऱ्यांची संख्या वाढलेली आहे. महापालिकेचा अतिक्रमण विभाग केवळ दिखाऊ कारवाई करतो. ज्याच्यावर कारवाई होते, तो काही तासांमध्ये अतिक्रमण करतो. ही पद्धती बदलायला हवी. कारवाईचा धाक हवा. वर्षभरात अद्यापही महापालिकेच्या कारभारात काही बदल झाल्याचे जाणवत नाही.
- सिद्धार्थ सोमाणी, कर सल्लागार
 
शहरातील पायाभूत सुविधा वाढविण्याची गरज आहे. वर्षभरात विशेष काही फरक जाणवत नाही. प्राथमिक शिक्षण, आरोग्य सुविधा सुधारणे यावर महापालिकेने अधिक लक्ष द्यायला हवे. कारभारात पारदर्शकता हवी, सध्या केवळ विविध टेंडरची चर्चा असते, पुणेकरांना सुधारणांचा फरक कधी जाणविणार हे महत्त्वाचे आहे. निश्‍चित धोरणे आखून त्यावर अंमलबजावणी व्हायला हवी. 
- वंदना कुलकर्णी, गृहिणी

पुणे शहर आता मेट्रोपॉलिटन झाले आहे. गेल्या वर्षभरात अनेक प्रकल्पांच्या घोषणा झालेल्या दिसतात. त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राजकारण्यांनी समाजभान राखावे. जाती-पातीचे राजकारण करून समाजात तेढ निर्माण होईल, असे काहीही करू नये. कोणतेही वक्तव्य करताना सामाजिक जाणीव ठेवावी. 
- के. श्रीकृष्ण, नोकरदार

महापालिकेचे गुणात्मक लेखापरीक्षण व्हावे जेणेकरून खर्च आणि उत्पन्नाचे मार्ग आहेत तसे समोर येतील. बीआरटीवर झालेला खर्च हा मेट्रो प्रकल्पामुळे निष्फळ ठरला. अशाप्रकारचा अनावश्‍यक खर्च टाळायला हवा. कामांचे एकात्मिक नियोजन व्हायला हवे. आता त्यात कोणतीच सुसूत्रता दिसत नाही. नागरिकांच्या पैशांचा हा अपव्यय आहे. प्रगतीच्या दृष्टीने नेटके नियोजन हवे.
- प्रकाशचंद्र नावंदर, चार्टर्ड अकाउंटंट  
 
मुलांचे शिक्षण होते पण नोकरी मिळत नाही. पुण्यासारख्या शहरात आम्हा लोकांना खूप कष्ट करावे लागतात. फळांच्या या व्यवसायात खूप महागाई जाणवते. महापालिकेने सुधारणा करताना सर्व घटकांचा विचार करायला हवा. गेल्या वर्षभरात फारसा फरक झाला असे वाटत नाही. अधिकाऱ्यांची मानसिकता बदलायला हवी. पीएमपीची सेवा सुधारायला हवी. प्रवाशांचे हाल वाढले आहेत, असाच अनुभव आहे. 
- सविता खोबडे, फळ व्यावसायिक

मध्य प्रदेशाहून इथे व्यवसायाकरिता आलो. परंतु येथे व्यवसाय करणे कठीण जाते. पालिकेकडून आम्हाला लायसन्स मिळत नाही. कारण विचारल्यास कागदपत्रे व्यवस्थित नसल्याचे सांगण्यात येते. छोट्या व्यावसायिकांसाठी योग्य धोरण हवे. 
- मुकेश दौरे, पाणीपुरी व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com