सुसाट दुचाकी बहाद्दरांच्या 'पुंगळ्या' ताईट करण्याचे आदेश 

marathi news pune sasvad traffic rules police order
marathi news pune sasvad traffic rules police order

सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) - येथे सासवड शहरात सुसाट बुलेट फिरविणारे.. पुंगळ्या काढून दुचाकी ताणपाटणारे.. अबाल-वृध्दांना त्रासदायक होईल अशी वाहने चालविणाऱ्यांचे आणि चालक परवाना नसताना मुला-मुलींच्या हाती पालकांकडून वाहने देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याबाबत खुद्द कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडेच तक्रार झाल्याने या दुचाकीबहाद्दरांच्या 'पुंगळ्या ताईट' करण्याची जबाबदारी सासवड पोलिस यंत्रणेवर नांगरे पाटील यांनी सोपविली आहे. 

गेल्या काही दिवसात सासवड शहरातील अनेक जाणकार नागरीकांनी दुचाकीस्वार नव्हे तर समाजाला दुचाकीने त्रस्त करणाऱया मुलांच्या कारवायांबद्दल अनेक तक्रारी केल्या. पालखीतळ व्यायाम मंडळाने तर लेखी तक्रार केली. त्यानंतर पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी रस्त्यावर वाहने जमवून वाढदिवस साजरे करण्याचा फंडा मोडीत काढला. मात्र गेले काही दिवस पुन्हा हा प्रकार सुरु झाला. त्यातच पुंगळ्या काढून दुचाकी ताणणारे तरुण वाढले. पदचाऱयांना सहज हे दुचाकीबहाद्दर उडवून जातात. त्यामुळे नुकतीच विश्वास नांगरे पाटील यांनी सासवड पोलिस ठाण्याला भेट दिली. यानिमित्ताने जबाबदार व जाणकार नागरीकांनी ही दुचाकीस्वारांची तक्रार थेट त्यांच्यासमोर मांडली. श्री. नांगरे पाटलांनी जिल्हा पोलिस अधिक्षक सुवेझ हक यांच्या उपस्थितीत भोरचे पोलिस उपअधिक्षक अण्णासाहेब जाधव व पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांना दुचाकीस्वारांवर कारवाईचे आदेशच बजावले. त्याशिवाय नागरीकांनी अशा त्रासाला स्थानिक पातळीवर दाद न मिळाल्यास मला किंवा वरीष्ठांना कळवा, असेही आवाहन केले. 

सासवड शहरात महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय, शाळांमध्ये संबंध नसलेली मुले दुचाकीसह येतात. वाहतुक नियम न पाळता वाहने ताणतात. मुलींची छेडछाड काढतात, मुलींना या दुचाकीबहाद्दरांच्या कारवाया वाढल्याने सुरक्षित वाटत नाही. यावर नजर ठेवायला पूर्वी निर्भया पथक होते, ते आता फारसे दिसत नाही. अशा तक्रारी झाल्या. त्यावर स्वतः नांगरे पाटील यांनी पोलिस ठाण्याचे 'निर्भया पथक' कोणाला माहीत आहे का, असे विचारल्यावर उपस्थितीत अनुत्तरीत झाले. त्यावरुन मामला लक्षात घेऊन श्री. नांगरे पाटील म्हणाले, 15 ते 30 वयोगटातील तरुण गँग बनवू पाहत आहेत. त्यांच्यावर घरातून व समाजातून बंधन राहीले नाही. त्यामुळे प्रथमतः प्रत्येक गावातील सार्वजनिक ठिकाणी त्यांना रोखा. सामाजिक घडी विस्कटत चालली असताना प्रत्येक सुजाण नागरीकाने हे काम करावे. पोलिस पेट्रोलींग वाढवा. कारवाया वाढवा. बेलगाम चालणाऱया दुचाकी, दुचाकींवरची टोळकी, रस्त्यावरचा वाढदिवस, डिजे, फटाके, टिंगलटवाळी, तरुणांचा धुडगुस थांबवा.. असा स्थानिक पोलिसांना आदेशच दिला. ग्रामीण भागातही हे काम पोलिस पाटलांनी पोलीसांना कळवून करावे, असेही बजावले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com