आगीपासून बचाव व खबरदारीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

marathi news pune seminar fire protection students guide
marathi news pune seminar fire protection students guide

जुनी सांगवी (पुणे) -  आज मोबाईलवर बोलत किंवा टीव्हीवरील मालिका बघत बघत स्वयंपाक करण्याचे महिलांमधील प्रमाण खूप वाढले आहे. मात्र, महिलांची ही सवय संपूर्ण घरासाठीच धोकादायक ठरू शकते. कारण मोबाईल किंवा टीव्ही पाहत स्वयंपाक करताना दुर्लक्ष होऊन आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महिलांनी मोबाईल आणि टीव्ही या दोन गोष्टी स्वयंपाकघरापासून दूर ठेवाव्यात, असे आवाहन सेफ किड्स फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले. 

जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि लिटल फ्लॉवर इंग्लिश व मराठी मिडियम स्कूलमध्ये सेफ किड्स फाऊंडेशनच्या सहयोगाने ‘सेफ किड्स अ‍ॅट होम’ या उपक्रमांतर्गत शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते. 

महिला स्वयंपाक करताना सैल, घोळसर कपडे घालून स्वयंपाक करताना दिसतात. साडीचा पदरही नीट खोचलेला नसतो. एका बाजूला लहान मुलांना कडेवर घेत स्वयंपाक सुरु असतो. दुसरीकडे गॅसची शेगडी सुरु असताना मोबाईलवर बोलणे किंवा मोबाईलवरील रेसिपी पाहून भाजी करणे सुरु असते. तसेच टीव्हीवरील मालिकेकडेही लक्ष असते. यामुळे दुर्लक्ष होऊन घरात आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महिलांनी स्वयंपाकघरात मोबाईल व टीव्हीपासून दूर राहावे. किचन कट्ट्यावर मोबाईल, चाकू, आगपेटी, तेलकट कापड ठेवणेही जोखमीचे आहे. मुलांचा हात पोहोचणार नाही, अशा ठिकाणी काडीपेटी आणि लायटर ठेवावा.  

मेणबत्त्या, डासांच्या उदबत्त्या, तेलाचे दिवे, ज्वलनशील पदार्थ  दूर ठेवावेत. याबरोबरच घराला आग लागल्यास काय खबरदारी घ्यावी, याबाबतही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. स्वतःला आग लागल्यास जिथे आहात तिथे थांबा, खाली पडा आणि लोळा. कपड्यांची पेटलेली बाजू भूमीलगत राहील, याची दक्षता घ्यावी. कपड्यांना आग लागल्यास घाबरून पळू नये. पळाल्यामुळे आग भडकू शकते. आपल्या साथीदाराला आग लागल्यास कोणतेही जाड कापड घेऊन जळणार्‍याभोवती गुंडाळावे. तसेच त्वरित प्रथमोपचार द्यावेत. विजेची उपकरणे हाताळतानाही काळजी घेणे गरजेचे आहे. काम झाल्यावर विजेच्या उपकरणांचे बटन बंद करून प्लग काढून ठेवावा. विजेची उपकरणे / बटणे यांच्याजवळ ज्वलनशील पदार्थ ठेवू नये. कोणत्याही उपकरणावर किंवा विजेच्या बटणावर त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्युतभार टाकू नये. ओल्या हातांनी विजेच्या उपकरणांना स्पर्श करू नये, असा सल्लाही यावेळी देण्यात आला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com