शिवरायांना जात, धर्मात अडकवू नका - संभाजीराजे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

पुणे - सर्व जातींतील लोकांना सोबत घेऊन, स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना जात आणि धर्मात अडकवू नये, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी येथे व्यक्त केले. 

पुणे - सर्व जातींतील लोकांना सोबत घेऊन, स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना जात आणि धर्मात अडकवू नये, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी येथे व्यक्त केले. 

पुणे कॅंटोमेंट बोर्डाच्या मुख्य कार्यालयातील आवारात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर राजीव सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव, उपाध्यक्ष अतुल गायकवाड, सदस्य विवेक यादव, विनोद मथुरावाला, अशोक पवार, दिलीप गिरमकर, डॉ. किरण मंत्री, रूपाली बिडकर, प्रियांका श्रीगिरी आदी उपस्थित होते. 

शिवाजी महाराजांनी स्वराज्यनिर्मितीसाठी काय केले, हे सर्वांना माहिती असल्याचे नमूद करीत संभाजीराजे म्हणाले, ‘‘शिवाजी महाराजांनी जात - पात आणि धर्मभेद मानला असता, तर स्वराज्याची निर्मिती झाली नसती. महाराजांनी सर्व जातींच्या लोकांना सोबत घेऊनच स्वराज्य स्थापन केले असल्याने ते कोणत्याही एका जात अथवा धर्माचे नाहीत.’’ शिवाजी महाराज यांची राजनीती, रणनीती, युद्धकौशल्य आणि गुणांचे आचरण केले पाहिजे, असे आवाहन ब्रिगेडिअर सेठी यांनी केले. उच्च न्यायालयाने पुतळ्यांच्या संदर्भात दिलेल्या निर्देशानंतर उभा राहिलेला हा देशातील पहिला पुतळा ठरला असल्याचा उल्लेख मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. यादव यांनी केला. उपाध्यक्ष गायकवाड यांनी पुतळा उभारताना आलेल्या अनुभवाची माहिती दिली. या वेळी पी. ए. इनामदार आणि महेंद्र थोपटे शिल्पकार, कर्मचारी आदींचा सत्कार केला.

Web Title: marathi news pune shivaji maharaj sambhajiraje