जयपूर-अत्रौली घराण्याचे पुण्यात "आर्काईव्ह' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

पुणे - प्रत्येक घराण्याची गायन शैली, आलापी, तानप्रकार, स्वर लगाव, लयकारीची पद्धत ठरलेली आहे. त्यामुळेच प्रत्येक घराण्याचे अस्तित्व आणि वेगळेपण प्रकर्षाने जाणवते. हे वेगळेपण अधिकाधिक श्रोत्यांसमोर यावे यासाठी जयपूर-अत्रौली घराण्याचे "आर्काईव्ह' पुण्यात उभे राहत आहे. या घराण्यात आजवर झालेल्या अनेक दिग्गज गायकांचे स्वर इथे कानावर पडणार आहेत; तसेच त्यांची दुर्मीळ छायाचित्रे आपल्यासमोर येणार आहेत. विशेष म्हणजे या "आर्काईव्ह'ची सुरवात गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांना अभिवादन करत होणार आहे. 

मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयाशेजारील "सुमती' इमारतीत हे "आर्काईव्ह' आकार घेत आहे. यासाठी गायक पं. रघुनंदन पणशीकर यांच्या शिष्या आणि युवा गायिका राधिका जोशी यांनी पुढाकार घेतला आहे. आपल्या घराण्याचा इतिहास जतन व्हावा म्हणून त्यांनी स्वत:च्या घराचेच "आर्काईव्ह'मध्ये रूपांतर केले आहे. "जयपूर गुणीजनखाना' असे त्याचे नामकरण करण्यात आले असून, ते शनिवारपासून (ता. 3) सर्वांसाठी खुले होणार आहे. 

जोशी म्हणाल्या, ""शास्त्रीय संगीतात जुन्या गोष्टी जतन करून ठेवण्याची पद्धत खूपच कमी आहे. त्यामुळे हे "आर्काईव्ह' उभारण्याचा निर्णय घेतला. याची सुरवात किशोरीताई यांच्याबाबतची सर्व माहिती जतन करत होणार आहे. यात त्यांची पुस्तके, त्यांच्यावरील लेख, त्यांच्या मैफलींचे रसग्रहण, त्यांची छायाचित्रे, दुर्मीळ ध्वनी-चित्रफितींचा समावेश असेल. या निमित्ताने "गानसरस्वती यशोगाथा' हे प्रदर्शनही येथे 3 ते 11 फेब्रुवारीदरम्यान भरवले जाणार आहे. या माध्यमातूनही ताईंचे संगीतविषयक विचार, त्यांची गायन शैली, त्यांच्या आठवणी उलगडल्या जाणार आहेत.'' "आर्काईव्ह'च्या पुढच्या टप्प्यात मोगूबाई कुर्डीकर यांच्यासह इतर गायकांचे जीवनकार्य श्रोत्यांसमोर आणले जाणार आहे, असेही त्या म्हणाल्या. 

जयपूर घराण्याचे अध्वर्यू कोण, या घराण्याची तत्त्व काय आहेत, कोण-कोण गायक होऊन गेले, त्यांचे शास्त्रीय संगीतात योगदान काय, असा जयपूर-अत्रौली घराण्याचा इतिहास आणि त्यासोबत किशोरीताईंचे कार्य जतन होणे, ते नव्या पिढीसमोर येणे गरजेचे आहे. ते काम या "आर्काईव्ह'च्या माध्यमातून होत आहे, याचा वेगळाच आनंद आहे. 
- पं. रघुनंदन पणशीकर, गायक 

Web Title: marathi news radhika joshi singer jaipur