छत्रपतींना वेगळी आदरांजली, 45 अंध पायी रायगडावर 

सुनील पाटकर
सोमवार, 5 मार्च 2018

45 अंध तरुणतरुणींनी रायगड पायी चढत आपल्या दृढ आत्मविश्वासाची साक्ष दिली आणि छत्रपतींना वेगळी आदरांजली अर्पण केली. 

महाड - रायगडाचा पराक्रम, सह्याद्रीचा राकटपणा, बुलंद बुरुज, उंच पायऱ्या आणि वळणावळणच्या वाटा रायगडाचा एकएक कण त्यांनी आपल्या अंतर्मनाने अनुभवला..आणि हद्यात साठवलाही, निमित्त होते ते रविवारी पार पडलेल्या शिवजयंतीचे. या शिवजयंतीच्या पवित्र दिवशी 45 अंध तरुणतरुणींनी रायगड पायी चढत आपल्या दृढ आत्मविश्वासाची साक्ष दिली आणि छत्रपतींना वेगळी आदरांजली अर्पण केली. 

महाराष्ट्रात सर्वत्र शिवजयंती ढोल-ताशाच्या गजरात उत्साहात साजरी झाली.रायगडावरुन शेकडो शिवज्योती गावोगावी नेण्यात आल्या परंतु अंध तरुणांच्या मनात आत्मविश्वासाची ज्योत पेटवण्याचे काम पुण्यामधील वेद वासुदेव प्रतिष्ठानने केले. वेद वासुदेव प्रतिष्ठानच्या वासुदेव सेवा संघाचे अध्यक्ष अजितदादा कृष्ण तुकदेव यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नाने स्वरगंधार सांस्कृतिक मंचाच्या अमित शुक्र, वैभव भोगल, सौरभ अत्रे, वैभव देसाई, गीता काळे, आनंद सुराना, विश्वंभर साबळे, अनिल पितळे इ. स्वयंसेवकांच्या सहाय्याने या अंध तरुणांना रायगड दर्शनासाठी आणले. रायगडावर रोपवेने न जाता, पायी चढून या अंधानी रायगड सर केला. आणि डोळसपणाने रायगडवरील वास्तु त्यांचा रोमांचकारक इतिहास अनुभवला. रायगड चढत असताना जाणवणाऱ्या पायऱ्या, देवडय़ा, बुरुज यांना स्पर्श करीत केवळ स्पर्शज्ञानाने शिवरायांच्या पराक्रमाची त्यांनी अनुभूती घेतली. इतिहासाचा हा अनमोल ठेवा त्यांनी आपल्या मनात साठवून ठेवला. 

रायगड दर्शना करतांना पुणे येथील अंध तरुण-तरुणींच्या वस्तीगृहातील या अंधांना कोणत्याहीं प्रकारचा त्रास होणार नाही याची स्वयंसेवकांनी खबरदारी घेतली होती.स्वयंसेवकांनी प्रत्येक वास्तुची माहिती या तरुणांना दिली. या अंधाना ही अनुभूती देण्यासाठी ग्रुप डायरेक्टर प्रविण पाखरे यांनी विशेष मार्गदर्शन केले. रायगडाच्या या प्रवासाची शिंदोरी सोबत घेत या अंधांनी प्रतापगड दर्शन घेतले आणि पुण्याला रवाना झाले. तत्पूर्वी दुपारच्या भोजनासाठी लोहारे येथील बालाजी हॉटेल येथे आले असता रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवामोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत भिलारे आणि बालाजी हॉटेलचे मालक जयेश लिंबाचिया यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि या सर्वांना मोफत भोजन देऊन या चांगल्या उपक्रमाला हातभार लावला.कोमल महाजन, प्रविण पाखरे, सविता धारगुडे, मुकेश बाणखडे, रेश्मा चांदणे, योगेश घुट, आकाश साळवे अशा 45 अंध तरुणतरुणींनी या मोहिमेत सहभाग घेतला.

Web Title: marathi news raigad fort blind people shivjayanti