कुसुमाग्रजांच्या कवितांतून जीवनसमृद्धी वाढली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन. हाच दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना रोशन दात्ये यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांवर स्वतः केलेल्या नृत्य संरचनांविषयी नीला शर्मा यांनी त्यांच्याशी केलेल्या गप्पागोष्टी... 

प्रश्न : कुसुमाग्रजांच्या कवितांवर नृत्य बसवण्याची कल्पना कशी सुचली? 
दात्ये : माझे माहेर नाशिकचे. तात्यां (कुसुमाग्रजां) च्या घराला लागून घर असल्याने त्यांच्याशी बऱ्याचदा बोलणे व्हायचे. मी आठवीत असताना शाळेत लोकनृत्य स्पर्धेसाठी वेगळा विषय निवडायला शिक्षिकांनी सांगितल्यावर मी तात्यांकडे कविता मागायला गेले. तेव्हा ते म्हणाले, "सोपानदेव चौधरी माझे मित्र आहेत. तुला त्यांच्यासाठी चिट्ठी लिहून देतो. ते योग्य असे गीत देतील. त्याप्रमाणे मी त्यांच्याकडे गेले. ते काम झाले. काही दिवसांनी मी तात्यांच्या "अहि- नकुल' या कवितेवर नृत्य बसवले. त्यासाठी त्यांच्याशी बोलले होते. लग्नानंतर पुण्यात आल्यावर बेबीताई ( रोहिणी भाटे) या महान गुरूंची शिष्या होण्याचे भाग्य लाभले. एकदा त्यांच्यासमोर "अहि - नकुल' कविता सादर केली. त्यांनी कौतुक केले. पुढे "पृथ्वीचे प्रेमगीत' बसवले. तोवर बेबीताईंमुळे माझी जाण वाढली होती. 

प्रश्न : बेबीताईंना भाषा विषय खूप आवडायचा ना? 
दात्ये : मराठी भाषा कशी बोलावी, लिहावी यासाठीही त्या आम्हा शिष्यांसाठी आदर्श होत्याच; पण हिंदी व संस्कृत भाषांबद्दलचे त्यांचे प्रेमही आम्हाला स्तिमित करायचे. त्यांनी या तिन्ही भाषांमधील उत्तमोत्तम काव्यरचना नृत्य संरचनांसाठी वेळोवेळी निवडल्या. स्वतः सुरेख काव्यरचना केल्या. या सगळ्यातून मलाही कवितांकडे बघण्याची वेगळी दृष्टी मिळाली. नृत्यातून कवितांचे सादरीकरण करण्याची आवड वाढली. 

प्रश्न: "अहि- नकुल' व "पृथ्वीचे प्रेमगीत' बसवताना काय विचार केला होता? 
दात्ये : "अहि- नकुल'मध्ये सर्प व मुंगुसाचे युद्ध आहे, तर "पृथ्वीचे प्रेमगीत'मध्ये पृथ्वीचा सूर्यासाठी समर्पण भाव आहे. पहिली कविता युगल, तर दुसरी एकल सादरीकरणातून मांडली. पहिली "ओतीत विखारी वातावरणी आग, हा वळसे घालत आला मंथर नाग,' अशी नुसती छंदात म्हटली. ते वीररसाला पोषक वाटले. यासाठी अनुकूल हस्तके (हस्तमुद्रा), स्थानके (उभे राहण्याचे पवित्रे) व भ्रमरींचा वापर केला, तर दुसरी कविता चालीत बांधली. त्यामुळे प्रेमभावनेचा गोडवा, नजाकत चांगल्या प्रकारे साकारता आली. 

"युगामागूनी चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, करावी किती प्रीतीची याचना,' हे कुसुमाग्रजांचे अलवार शब्द, त्यातली ती उत्कटता, तो सखोल आशय एकूणच जीवनसमृद्धी वाढवणारा ठरला. 

Web Title: marathi news Roshan Datye Kathak interview kusumagraj marathi