सहज स्वभावाने आनंदी असणे!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

एक योगी, द्रष्टा आणि आत्मज्ञानी, प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्‌गुरू हे भारतातील पहिल्या  ५० अतिशय प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सद्‌गुरूंना भारत सरकारतर्फे २०१७ मध्ये ‘पद्मविभूषण’ने सन्मानित करण्यात आले आहे. 

सद्‌गुरू म्हणतात की राग असो, आनंद किंवा प्रेम, काहीही असो, जर तुम्ही ते अखंडितपणे काही काळासाठी स्थिर ठेवू शकलात, तर ते साक्षात्काराचे साधन होऊ शकते.

प्रश्‍न - जेव्हा माझं मन आनंदी आणि स्पष्ट असतं, तेव्हा माझ्या आतमध्ये एक प्रकारचा उल्हास असतो, जणू मी विरघळतोय; पण मी कितीही प्रयत्न केला तरी माझ्या सभोवतालचे लोक मला त्या स्थितीत राहू देत नाहीत आणि जर मी सर्वांपासून वेगळा राहिलो, तर मला एकटं वाटतं. तर मी काय करावं?

सद्‌गुरू - जेवढं तुम्ही जास्त एकाकीपणा आणि नैराश्‍य अनुभवता, तेवढी जास्त तुम्हाला इतरांच्या संगतीची गरज भासणार. जितके तुम्ही जास्त आनंदी, उल्हासपूर्ण बनता, इतरांच्या संगतीची गरज तेवढी कमी होते. सर्वांपासून वेगळं, एकटं असताना जर तुम्हाला एकाकीपणा जाणवत असेल, तर साहजिकच तुम्ही चुकीच्या संगतीत आहात! जर तुम्ही चांगल्या व्यक्तीच्या संगतीत असला तर तुम्हाला एकाकीपणा का वाटेल? तुम्हाला नक्कीच छान वाटलं असतं. आजकाल लोकांची उत्साही असण्याची कल्पना म्हणजे गप्पागोष्टी, नाच-गाणं, अमुक करूया- तमुक करूया! पण तुम्ही केवळ शांत बसूनसुद्धा पूर्णपणे उल्हासित असू शकता.

जर तुम्हाला रागवायचं असेल, तर चोवीस तास; न थांबता राग धरा, तुम्हाला आत्मज्ञान होईल. जर तुम्हाला प्रेम आवडत असेल, तर चोवीस तास प्रेमळ राहून बघा. तुम्हाला आत्मज्ञान होईल.

जर तुमचा उत्साह कृत्रिम असेल तर तुम्हाला संगतीची गरज भासेल. तुमचा नैसर्गिक स्वभावच जर उल्हासपूर्ण बनला, जर तुमच्या आतलं जीवन उत्साही झालं असेल, तर तुमची कृतीसुद्धा त्याचाच परिणाम असेल. याउलट, जर तुमचं जीवन उत्साही नसेल आणि उत्साह निर्माण करण्यासाठी तुम्ही तुमची कृती अधिक तीव्र करत असाल, तर तुमची कृती हे एकमात्र साधन होईल.

हाच एक मोठा फरक आहे. एकतर तुम्ही नाचगाण्यानं एक प्रकारच्या उत्साहाच्या स्थितीत येण्याचा प्रयत्न करता किंवा तुम्ही स्वतःच इतके उल्हासपूर्ण झाला आहात आणि तो उल्हास तुम्हाला तुमच्या आत सामावता न आल्यानं तुम्ही आनंदाने नाचता, गाता. या दोन अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे एकतर तुम्ही आनंदी आहात म्हणून तुमच्यातून सहज हास्य उमटतं किंवा कोणीतरी तुम्हाला सांगितलंय, ‘दररोज सकाळी तुम्ही हसायचा व्यायाम केला की एक दिवस तुम्ही आनंदी व्हाल.’ यासुद्धा दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जरा तुमच्या आजूबाजूला बघा आणि सांगा, जीवन कशा प्रकारे काम करत आहे?

जरा फुलांकडे पाहा. तुम्हाला काय वाटतं, फुलं आहेत आणि त्यांना आधार म्हणून त्यांच्याभोवती रोप आणि मुळे निर्माण झाली? नाही. देठात असलेला उत्साह रोपाला आवरता आला नाही म्हणून फुलं उमलली, नाही का? जीवन असंच घडलं पाहिजे. जर तुम्ही याउलट जगायचा प्रयत्न केला, तर आयुष्य अत्यंत अवघड होऊन बसेल.

वास्तविक दुःखी असणं, पण जगात सतत आपण आनंदी असल्याचा देखावा करणं, असे आयुष्य अगदी अवघड. दुःखी असताना, आनंदी असल्याचं दाखवण्यासाठी प्रचंड जीवन ऊर्जा खर्ची पडते. हे तुमच्या लक्षात आलंय का कधी? काही माणसं अशी असतात, की जेव्हा ते आनंदी दिसतात, तेव्हा ते खरोखर आनंदी असतात. जेव्हा ते दुःखी दिसतात, तेव्हा खरोखर दुःखी असतात. जे आहे ते निखळपणे सर्वांना दाखवतात आणि सर्वांना त्यांच्या आत काय चालू आहे ते माहीत असतं. पण, काही लोक सतत आनंदी असल्याचं ढोंग करतात, पण असं करायला भरपूर जीवन ऊर्जा खर्च करावी लागते. असे सतत ढोंग करणारी माणसे मग वेगवेगळ्या व्याधींना बळी पडतात. तुमच्या मनाला सतत एका प्रकारचं वळण दिलंत, तर खरंच तुम्ही स्वतःवर हे ओढवून घ्याल.

लोक अशा व्याधींपासून वाचत आहेत याचं एकमात्र कारण म्हणजे ते कोणतीही गोष्ट कधीही अखंडितपणे करत नाहीत. त्यांचा आनंद कधी ऑन, तर कधी ऑफ असतो. त्यांचं दुःख कधी ऑन तर कधी ऑफ असतं. ते कधीच पूर्ण ऑन नसतं. तुम्ही पूर्णपणे दुःखी झालात तर तुम्हाला त्याचे परिणाम दिसतील. तुम्ही पूर्णपणे आनंदी झालात, तर त्याचेसुद्धा तुम्हाला परिणाम दिसतील किंवा जर तुम्ही पूर्णतः क्रोधीत झालात तर त्याचेही परिणाम तुम्हाला दिसून येतील. पण, तुम्हाला यातील कशाचेच परिणाम दिसून येत नाहीत; कारण तुम्ही कायम, एका क्षणी ऑन तर दुसऱ्या क्षणी ऑफ होत असता.

लोक मला विचारतात, ‘‘सद्‌गुरू, कोणत्या प्रकारची भावना आणि मनोवृत्ती मी बाणली पाहिजे?’’ आणि मी म्हणतो, ‘‘कोणतीही असूद्या.’’ जर क्रोधीत व्हायचं आहे, तर चोवीस तास क्रोधीत राहा, न थांबता. तुम्ही आत्मज्ञानी व्हाल. जर तुम्हाला प्रेम आवडत असेल, तर चोवीस तास केवळ प्रेमात राहून बघा. तुम्ही आत्मज्ञानी व्हाल. काहीही करा, पण ते सतत चालू असूद्या, तुम्हाला साक्षात्कार होईल. एवढ्याचीच गरज आहे.

या ब्रह्मांडातील सर्वकाही प्रत्येक पेशी, प्रत्येक अणू तुम्हाला भौतिक अस्तित्वाच्या पलीकडील विश्‍वात जाण्याचे द्वार बनू शकतो, जर तुम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा केला तर, पण समस्या ही आहे की लोक सतत आपली दिशा बदलत असतात. ही सतत दिशाबदल करण्याची प्रवृत्ती पूर्वी कधी नाही, इतकी आजच्या काळात वाढली आहे. आजकाल लोकांचं लक्ष केंद्रित करण्याची क्षमता अगदी कमी झालेली आहे आणि ते हे अगदी कौतुकाने मिरवत आहेत. जर तुम्ही सतत बदलत राहिलात तर काहीच घडणार नाही. तुम्हाला पाहिजे ती दिशा निवडून त्या दिशेनं जा, काही हरकत नाही, पण न बदलता, निश्‍चलपणे.

सद्‌गुरूलिखित ‘इनर इंजिनिअरिंग’ या न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलर पुस्तकाचा ‘आत्मज्ञानाचे विज्ञान’ हा मराठी अनुवाद ‘सकाळ प्रकाशना’ने प्रकाशित केला आहे. हे पुस्तक ‘सकाळ’च्या पुण्यातील मुख्य कार्यालयात, तसेच सर्व आवृत्ती कार्यालयांत आणि महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.

 ऑनलाइन खरेदीसाठी संपर्क www.sakalpublications.com  किंवा amazon.in 
 मनीऑर्डर/ ड्राफ्ट पाठवण्यासाठी पत्ता- ‘सकाळ प्रकाशन’, ५९५, बुधवार पेठ, पुणे ४११००२. 
 अधिक माहितीसाठी संपर्क ८८८८८४९०५० 
(कार्यालयीन वेळेत) 
 http://isha.sadhguru.org/

Web Title: marathi news sadguru author Inner Engineering book