गरीब विद्यार्थ्यांना 'विद्याधन' शिष्यवृत्ती मिळविण्याची संधी

टीम ई सकाळ
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

पुणे : 'इन्फोसिस'चे सहसंस्थापक एस.डी. शिबुलाल आणि त्यांच्या पत्नी कुमारी शिबुलाल यांनी सुरू केलेल्या सरोजिनी दामोधरन फाऊंडेशनच्या वतीने यंदापासून महाराष्ट्रात विद्याधन शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील. अकरावी आणि बारावीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच, त्यांनी चांगली गुणवत्ता मिळविल्यास पुढील पदवीच्या शिक्षणासाठीही त्यांना अभ्यासक्रमाच्या शुल्कानुसार 10 ते 60 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. 

विद्याधन शिष्यवृत्तीअंतर्गत देशातील सहा राज्यांमधील गरीब विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो. दहावी, अकरावी किंवा बारावीमध्ये किमान 90 टक्के गुण मिळविलेले सर्वसाधारण विद्यार्थी, तसेच 75 टक्के मिळविलेल्या अपंग विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. www.vidyadhan.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येतील. अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर आहे. अधिक माहितीसाठी vidyadhan.maharashtra@sdfoundationindia.com या ईमेल पत्त्यावर संपर्क साधता येईल. 

Web Title: marathi news sd foundation vidyadhan scholarship appeal