शिरसाई उपसा योजना दोन दिवसांत सुरु होणार

संतोष आटोळे 
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

शिर्सुफळ : बारामती तालुक्यातील जिरायत भागास वरदान ठरलेली शिरसाई उपसा सिंचन योजना येत्या दोन- तीन दिवसात कार्यन्वित होणार आहे. शिर्सुफळ तलावातील मुख्य पाणी उपसा केंद्रावर असलेल्या विद्युत पंप मोटारींची तसेच लाभक्षेत्रातील पोटचाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे युध्दपातळीवर सुरु आहेत.

गेल्या वर्षभरापासुन गाजत असलेल्या थकित विजबिलाचा प्रश्न महावितरणच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेत सोडविण्यात आला आहे. यामुळे लवकरच योजना कार्यान्वित केली जाईल. यामुळे लाभक्षेत्रातील शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि बारामती तालुक्यातील जिरायत पट्ट्यातील गावांचा शेती सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी सन 2000-2001 मध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातुन कोट्यावधी रुपये खर्चुन शिरसाई उपसा सिंचन योजना सुरु करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातुन तालुक्याच्या जिरायत भागाला वरदान मिळाले. सदर योजना ब्रिटीश कालीन शिर्सुफळ तलावावर राबविण्यात आली. गेल्या तीन वर्षापासुन योजना नियमित चालु आहे.यंदा मात्र थकित विजबिलाच्या प्रश्नामुळे योजना कार्यान्वित करण्यात अडचण येत होती.  या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते व पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनी दिलेल्या माहिती नुसार शुक्रवार (ता.23) फेब्रुवारी रोजी थकित विजबिलाबाबत महावितरण विभागासह सकारात्मक चर्चा झाली आहे. यामुळे येत्या दोन तीन दिवसात योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. याचा फायदा शिरसाई डावा कालवाच्या माध्यमातुन जराडवाडी, उंडवडी कडेपठार, गोजुबावी, याभागातील तर शिरसाई उजवा कालव्याच्या माध्यमातुन उंडवडी सुपे, कारखेल, खराडेवाडी, साबळेवाडी व इतर भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतीसिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यामध्ये डाव्या कालव्यांवरील गावासह उजव्या कालव्यावरील उंडवडी सुपे, साबळेवाडी या गावांनी वसुलीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. इतर गावांनीही यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन दिलीप खैरे यांनी केले. सध्या शिर्सुफळ तलावामध्ये 326 दशलक्ष घनफुट पाणीसाठा आहे. यापैकी 306 दशलक्ष घनफुट पाणीसाठा वापरण्यायोग्य तर 20.58 दशलक्ष घनफुट पाणीसाठा मृतसाठा आहे. पाणीसाठ्याची टक्केवारी 91.20 टक्के आहे अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता एस.एम.साळुंके यांनी दिली.

योजना सुरु होण्याच्या पार्श्वभूमिवर शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या पंपगृहातील विद्युत मोटारींची तसेच लाभक्षेत्रातील पोटचाऱ्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. यामुळे सध्या योजना सुरु होणे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असुन उन्हाळ्यातील पाण्यावाचुन जळणारी पिके जगणार असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधुन समाधान व्यक्त होत आहे.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shirsai news